अहमदनगर: अहमदनगर- शेंडी-मनमाड बायपास रोडवर अंधारात काही लोक राजस्थान व हरियाणा पासिंगच्या दोन ट्रकमधून येऊन गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होते, अशी गुप्त माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. या आधारे कारवाई करण्याबाबत पोलिसांना सूचना मिळाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत टोळीला अटक केली आहे.
असा आहे घटनाक्रम: पोलीस पथक 10 ऑगस्टला रात्री आठच्या सुमारास शेंडी ते मनमाड बायपास रोडवर दाखल झाले होते. त्यावेळी हॉटेल किनाऱ्याच्या पुढे दोन ट्रक रस्त्याच्या कडेला लावून काही संशयित अंधारात दबा धरुन बसलेले पोलीस पथकास दिसले. पोलीस त्यांना ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना दोन संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. मात्र, पोलीस पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. सुरूवातीला चौकशी दरम्यान संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
'ही' आहेत संशयितांची नावे: संशयितांमध्ये अरशद हसन खान, मोबीन जगमाल खान, अहमद उस्मान खान, खलील महंमद इसराईल खान, सुनिल रामअवतार कुमार, खुर्शिद मंगल खान, मोहमंद आरिफ जोरमल, हासिम बसरु खान, अलीम करीउद्दीन खान, ताजमहंमद रहेमान, रईस इसाक खान यांचा समावेश आहे. हे सर्व राजस्थान आणि हरियाणा येथील रहिवाशी आहेत. तर मोहमंद अफजल जोरमल, तय्यब मंगलखान असे फरार संशयितांची नावे आहेत.