महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 4, 2021, 12:32 PM IST

ETV Bharat / state

'बोठे' पोलिसांपेक्षा 'मोठे' : रेखा जरे हत्याकांडातील आरोपी अद्याप फरार

30 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे या पुण्याहून नगरकडे आपल्या वाहनातून परतत असताना त्यांचा जातेगाव घाटात चाकूने गळा कापून निर्घृण खून करण्यात आला. हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि एका नामांकित वृत्तपत्राचा नगर जिल्हा आवृत्तीचा संपादक बाळ ज.बोठे अद्याप फरार आहे.

रेखा जरे हत्याकांड
रेखा जरे हत्याकांड

अहमदनगर - जेष्ठ आणि पोलीस, सामाजिक, राजकीय आदी वर्तुळात दबदबा ठेवून असलेला पत्रकार पोलिसांना सापडेनासा झालाय. सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि एका नामांकित वृत्तपत्राचा नगर जिल्हा आवृत्तीचा संपादक बाळ ज.बोठे एक महिना उलटला तरी अहमदनगर जिल्हा पोलिसांना सापडलेला नाही.

हत्या प्रकरण हे नियोजनबद्ध -

30 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे या पुण्याहून नगरकडे आपल्या वाहनातून परतत असताना त्यांचा जातेगाव घाटात चाकूने गळा कापून निर्घृण खून करण्यात आला. 'सुत्रधाराच्या' नियोजनानुसार गाडीचा धक्का लागून वादावादीत हा खून झाल्याचे दाखवायचे होते. मात्र, मृत रेखा जरे यांच्या मुलाने एका आरोपीचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेतला आणि त्यानंतर पोलिसांनी तत्परतेने प्रत्यक्ष हत्या करणाऱ्या आरोपींचा तत्काळ शोध लावत त्यांना जेरबंद केले. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. जेरबंद केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीतून जरे हत्या प्रकरण हे नियोजनबद्ध होते आणि याचा मुख्य सूत्रधार जेष्ठ नामांकित पत्रकार बाळ ज.बोठे असल्याचे पुढे आले.

मुख्य सुत्रधारच पोलिसांच्या हाती लागेना -

पोलिसांनी तीन डिसेंबर रोजी या प्रकरणी सहाव्या आरोपीची नोंद केली आणि पत्रकार परिषद घेत. तसे घोषितही केले. मात्र आता एक महिना उलटल्यानंतरही बोठे अजूनही पोलिसांना गुंगारा देत मोकाट फिरत आहे. रेखा जरे यांची हत्या का करण्यात आली याचे उत्तर बोठेकडेच असल्याने पोलिसांच्या हाती पाच आरोपी सापडूनही प्रत्यक्षात हाती काहीच लागलेले नाही. कोणत्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष घटना आणि त्यामागचे मूळ कारण हे महत्वाचे असते आणि त्यावरच आरोपींना गुन्हेगार ठरवून शिक्षा दिली जाते. पोलिसांनी केलेल्या तपासावरच न्यायालयात निर्णय घेण्यात येतो. मात्र, मुख्य सुत्रधारच पोलिसांना 'अथक' प्रयत्न करूनही सापडत नसल्याने या प्रकरणाचा पुढील तपास एकप्रकारे थांबलेला आहे.

जिल्हा पोलिसांच्या नावलौकिकावर प्रश्नचिन्ह -

नगर जिल्हा पोलीस दलाचा गुन्ह्याचा तपास लावण्याबाबत लौकीक आहे. अनेक बिकट आणि किचकट प्रकरणात नगर जिल्हा पोलीस दलातील विविध शाखांनी कौतुकास्पद कामगिरी करत गुन्ह्यांची उकल केली आहे, ही उकल करताना गुन्हेगारांना शोधून काढण्याच्या कसबाची दखल राज्यस्तरावर घेत गृहमंत्रालयाने नगर पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची पाठ थोपटली आहे. असे असताना आता नेमके ज्या गंभीर प्रकरणाबाबत जिल्ह्यात मोठी उत्सुकता असताना अशा गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेला बाळ ज.बोठे का सापडत नाही, असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.

पोलिसांसमोर आव्हान -

दरम्यान बोठेच्या शोधात अनेक पथके काम करत असताना त्याच्या विरोधात इतर दोन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. अर्थात बोठेच्या कृष्णकृत्यावर पीडित पुढे येत असताना बोठे पोलिसांच्या हातावर तुरी देत मोकाट आहे. हे निश्चितच नगर जिल्हा पोलिसांना भूषणावह नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. बोठेच्या अटकेनंतरच रेखा जरे हत्येचे कारण स्पष्ट होणार असून आता बोठेला अटक करण्याचे मोठे आव्हान नगर पोलिसांसमोर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details