अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडाचा संशयित सूत्रधार पत्रकार बाळ बोठे सापडत नसल्याने त्याच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार अन्य काही कारवाई करता येईल का, याचा विचार पोलिसांनी सुरू केला आहे. अर्थात पोलिसांकडून याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले जात नाही. या हत्याकांडाप्रकरणी अटक आरोपीकडून बोठे हा मुख्य सूत्रधार असल्याचे पुढे आल्यानंतर तब्बल वीस दिवसांनंतरही त्याचा शोध पोलीस लावू शकलेले नाहीत, अशात आता पोलिसांच्या शोधकार्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे. पण, शोध घेऊनही बोठे सापडत नसल्याने त्याच्याविषयी चुकीची माहिती मिळत का, तसेच त्याच्याविरुद्ध अन्य कोणती कायदेशीर कारवाई करता येईल व तिचा काही उपयोग होईल काय, यादृष्टीने पोलिसांनी विचार सुरू केला.
पोलिसांकडून तपासाबाबत चुप्पी
अन्य कारवाई काय असेल, हे मात्र गुलदस्त्यात असून प्रत्यक्ष कारवाईनंतरच ते स्पष्ट होण्याची शक्यताही यातून दिसू लागली आहे. याबाबत सध्या तपासी अधिकारी किंवा इतर वरिष्ठ अधिकारी अधिकृतपणे माध्यमांशी बोलण्यास तयार नाहीत. तपास सुरू असल्याचे साचेबद्ध उत्तर सध्या दिले जात आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील पसार आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा पोलिसांना अद्यापपर्यंत छडा लागलेला नाही. दुसरीकडे आता पुढील कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अंतर्गत तयारीही सुरू केली आहे. पोलिसांनी केलेल्या बोठेविषयी माहिती देण्याच्या आवाहन पोलिसांनी केले होते. यास काहींनी चांगला प्रतिसाद देत माहितीही दिली. पण, त्याचा ही काहीच फायदा पोलिसांना झाला नाही. यामुळे माहिती देणारेच पोलिसांची दिशाभूल तर करत नसतील ना, अशी शंका उपस्थित होत आहे.
वीस दिवसानंतरही बोठे पोलिसांना सापडेना