अहमदनगर -राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातील अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्याने सध्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशीच परिस्थिती मंगळवारी जिल्ह्यात निर्माण झाली होती. अवघा काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा जिल्ह्यातील प्रमुख रुग्णालयांमध्ये शिल्लक होता. या सर्व प्रकाराची माहिती जिल्हा प्रशासन, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. ऑक्सिजन वेळेवर उपलब्ध न झाल्यास जवळपास आठशे रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो, याची कल्पना देखील मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. त्यानंतर तातडीने पुण्याहून एक ऑक्सिजनचा टॅंकर अहमदनगरला पाठवण्यात आला आहे. या ऑक्सिजनचे वाटप रुग्णालयांना करण्यात आले आहे.
शहरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणीबाणीची परस्थिती निर्माण झालेली असताना, जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे पुण्याहून एक टॅंकर ऑक्सिजन मिळाला. मात्र हे टॅंकर ऑक्सिजन घेऊन अहमदनगरकडे निघाल्यानंतर पुणे जिल्हा प्रशासनातून काही हालचाली झाल्या, आणि टँकर वाटेतच आडवून ठेवण्यात आला. याची माहिती मिळताच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तसेच राज्यांच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली. या चर्चेनंतर हे टॅंकर अहमदनगरला रवाना झाले. मात्र अडचण इथेच संपली नाही, तर टॅंकर शहरात आल्यानंतर तो न्यू आर्ट्स कॉलेज या ठिकाणी बंद पडला. याची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप यांनी यंत्रणा कामाला लावून हा टॅंकर दुरुस्त केला, व टॅंकर प्लांटकडे रवाना झाला. दरम्यान टॅंकर प्लांटवर पोहोचताच ऑक्सिजनचे वितरण सुरू झाले.