अहमदनगर -महापौर पदासाठी बुधवारी संपूर्ण राज्यात सोडत काढण्यात आली. अहमदनगर महानगरपालिकेत पुढील महापौर पदाचे आरक्षण अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी निघाले आहे. त्यामुळे अनुसुचित प्रवर्गातील महिला नगरसेविकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. अहमदनगर महानगरपालिकेत महापौर पदासाठी भाजपकडे उमेदवारच नसल्याने भाजपच्या आशा मावळल्या आहेत.
मागच्या वेळी पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला साथ दिली होती. त्यामुळे भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांना महापौरपदाची संधी मिळाली. परिणामी सर्वाधिक संख्याबळ असूनही शिवसेनेला विरोधात बसावे लागले. आता मात्र, महापौरपदासाठी पुढील वर्षांचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आहे. भाजपकडे त्यासाठी उमेदवारच नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अडीच वर्षांच्या काळासाठी महापौरपदाचे डोहाळे लागले आहेत.
हेही वाचा - पुण्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू