महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर रुग्णालय अग्निकांड : दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची खासदारांची मागणी

धुरामुळे रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. त्यावर शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आक्षेप घेतला आहे. काही रुग्णांचा आग लागून होरपळून मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन अहवालानुसार कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले आहे.

अहमदनगर सरकारी रुग्णालय
अहमदनगर सरकारी रुग्णालय

By

Published : Nov 6, 2021, 4:53 PM IST

Updated : Nov 6, 2021, 5:03 PM IST

अहमदनगर-अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित आहे. आगीच्या दुर्घटनेत 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी अहमदनगर दक्षिणेचे खासदार सुजय विखे-पाटील व अहमदनगर उत्तरेचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली.

शासकीय रुग्णालयात शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. अतिदक्षता विभागात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर वार्डमध्ये प्रचंड धूर पसरला. आग आणि धूर यामुळे या ठिकाणी असलेल्या सतरा रुग्णांपैकी 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चार महिला आणि सात पुरुष आहेत. काही रुग्णांची ओळख पटलेली नाही.

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची खासदारांची मागणी

संबंधित बातमी वाचा-अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयू वॉर्डला आग; 11जण दगावले!

आगीतून बचावलेल्या सहा रुग्णांपैकी दोन रुग्णांना अद्यापही श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती खासदार सुजय विखे-पाटील यांनी केली आहे.

संबंधित बातमी वाचा-नगरमध्ये रुग्णालयाला आग; जाणून घ्या यापूर्वी कुठे कुठे घडल्या होत्या अशा घटना...

जिल्हा रुग्णालयांतील दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी विविध पक्षांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे. येत्या आठ दिवसांमध्ये या पद्धतीची सर्व चौकशी होऊन गुन्हे दाखल करावेत. मृत रुग्णांच्या नातेवाईकांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशी लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे. त्याचबरोबर मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घ्यावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातमी वाचा-Ahmednagar Hospital Fire Live Updates: अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयू वार्डाला आग; 11 जणांचा मृत्यू


आज संध्याकाळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार रोहित पवार आदी या ठिकाणी दाखल होऊन परिस्थितीची माहिती घेणार आहेत. धुरामुळे रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. त्यावर शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आक्षेप घेतला आहे. काही रुग्णांचा आग लागून होरपळून मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन अहवालानुसार कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले आहे.

सध्या या ठिकाणी असलेले मृत रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश दिसून येत आहे. वेगवेगळे संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले आहेत. दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Last Updated : Nov 6, 2021, 5:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details