अहमदनगर - जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात चारा छावण्या अचानक बंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी कार्यालयातच ठिय्या मांडला. एवढेच नाही तर संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदाराच्या खुर्चीला हार घालून प्रशासनाचा निषेध देखील केला.
चारा छावण्या अचानक बंद, शेवगावचे शेतकरी आक्रमक हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांवर तरुणीने फेकला शाईचा फुगा
शेवगाव तालुक्यात उन्हाळ्यात पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची भीषण परिस्थिती असल्याने मोठ्या प्रमाणात चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या. पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिने झाले तरी या भागात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे सरकारने चारा छावण्या सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी शेवगाव तालुक्यातील काही छावण्यांनी अचानक छावणी बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे छावण्यांमध्ये जनावरे असलेल्या शेतकऱ्यांपुढे चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर आंदोलन करत तात्काळ छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तहसील कार्यालयात जनावरे सोडू, असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, जिल्हापरिषद सदस्या हर्षदा काकडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - मानधनवाढीसाठी अहमदनगर आशा सेविकांचा जिल्हापरिषदेवर एल्गार