अहमदनगर - नगर शहरातील शांतीनगर येथे दोन दिवसापूर्वी कोरोनाबाधित आढळून आलेल्या ड्रायव्हरची २२ वर्षीय मुलगी आणि सुभेदार गल्ली येथील वृद्ध महिलेच्या संपर्कातील २० वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. दोघे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ६२ झाली आहे.
अहमदनगर शहरात दोन नवे कोरोना पॉझिटिव्ह.. जिल्ह्यातील आकडा 62 वर - कोरोना पॉझिटिव्ह
अहमदनगर शहरात २२ वर्षीय तरुणी व २० वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ६२ वर पोहोचला आहे. याशिवाय परजिल्ह्यातील एक महिलाही बाधित असल्याचे समोर आले होते. आता ४० व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत.
शुक्रवारी सायंकाळी पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून १९ जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात हे दोघे बाधित आढळून आले तर उर्वरित १७ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बाधित तरुणीच्या वडिलांचा दिनांक १३ मे रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच्या संपर्कातील इतर व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या व्यक्तीच्या मुलीलाच कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.
याशिवाय, नगर शहरातील सुभेदार गल्ली येथील एक वृद्ध महिला दोन दिवसापूर्वी कोरोना बाधित आढळून आली होती. याच गल्लीत राहणाऱ्या एका युवकाचा अहवालही आज पॉझिटि्ह आला आहे. या व्यक्तीचा दोन दिवसापू्वीच स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, प्रयोगशाळेने ते रिजेक्ट केल्याने पुन्हा पाठविण्यात आले होते.
आतापर्यंत एकूण १,८१९ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १,६९९ स्त्राव निगेटिव्ह आले तर ६२ व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले. याशिवाय परजिल्ह्यातील एक महिलाही बाधीत असल्याचे निष्पन्न झाले होते. आता ४० व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत.