अहमदनगर - जगभरात 'कोरोना विषाणू' पसरत असला, तरी नगर जिल्ह्यात या आजाराचा अद्याप एकही रुग्ण नाही. प्रशासनाने या आजाराचा मुकाबला करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. नागरिकांनी 'कोरोना'ची धास्ती घेऊ नये. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील' असा इशाराही त्यांनी दिला. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत एक निवेदन जारी केले आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, बूथ हॉस्पिटल, शिर्डी आणि शनी शिंगणापूर देवस्थानची रुग्णालये या ठिकाणी संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती द्विवेदी यांनी दिली. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक बापूसाहेब गाढे, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण हे जिल्हाधिकाऱ्यांसोबत उपस्थित होते.
हेही वाचा -दुबईहून तेलंगणात परतलेला 'तो' रुग्ण कोरोना निगेटीव्ह, दहा दिवसांपूर्वी होता पॉझिटीव्ह
नगरमधील एकाच कुटुंबातील चौघे दुबईतून एक मार्चला परत आले. विशिष्ट देशांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी विमानतळावर सुरू होती. त्यात दुबईचा समावेश नव्हता. त्यामुळे या चौघांची तपासणी झाली नाही. मात्र, सोशल मीडियावर त्यांच्याविषयी नाहक चुकीचे संदेश पसरवले गेले. त्यांना कोरोना'ची लागण झालेली नाही. प्रशासनाने या चौघांचीही तपासणी केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना दक्षता घेण्याची सूचना केली असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.
जिल्हा शासकीय रुग्णालय, बूथ हॉस्पिटल, शिर्डी आणि शिंगणापूर येथे दक्षता कक्ष स्थापन केले आहेत. त्यात एकूण 95 बेडची व्यवस्था केली आहे. सध्या परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. आगामी यात्रा, जत्रांच्या अनुषंगाने प्रातांधिकारी, तहसीलदारांना संबंधित देवस्थानाशी संपर्क साधून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत, असेही द्विवेदी म्हणाले.