महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर जिल्ह्यात धक्कादायक निकालाची शक्यता? मतमोजणीची उत्सुकता शिगेला - vidhan sabha election news

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या गेल्या काही महिन्यांत मोठी राजकीय उलथापालथ झालेली पहायला मिळत आहे. पुन्हा एकदा विखे विरुद्ध थोरात आणि विखे विरुद्ध पवार असा कलगीतुरा पहायला मिळत आहे. कर्जत-जामखेड या मतदारसंघातील रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे जरी असले तरी ही लढाई खर तर विखे विरुद्ध पवार अशीच आहे.

अहमदनगर जिल्ह्यात धक्कादायक निकालाची शक्यता? मतमोजणीची उत्सुकता शिगेला

By

Published : Oct 23, 2019, 7:34 PM IST

अहमदनगर - ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा, सहकार क्षेत्रात अग्रेसर आणि राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणुन अहमदनगर जिल्हा ओळखला जातो. उत्तर आणि दक्षिण अहमदनगर असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. उत्तर अहमदनगर (शिर्डी) हा शिवनसेनेच्या हातात असून भाजपकडे दक्षिण अहमदनगर (अहमदनगर) लोकसभा मतदारसंघ आहे. जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 12 मतदारसंघ आहेत. सध्या या जिल्ह्यात भाजपचे 5, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 3 आणि शिवसेनेचा एक आमदार आहे. जिल्ह्यातील कर्जत, नगर, पारनेर, कोपरगाव या ठिकाणाहून धक्कादायक निकालाची अपेक्षा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकुण मतदारसंघ -

अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड या 6 तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

१) अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ -

राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप हे इथे विद्यमान आमदार आहेत. अहमदनगर शहरात 2014 च्या निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळाली. भाजप, शि-वसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सर्वांचे उमेदवार होते. यात बाजी मारली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी. जगताप यांच्या आधी 25 वर्ष शिवसेनेचे अनिल राठोड हे आमदार होते. तर काँगेसकडून सत्यजित तांबे, भाजपकडून अॅड. अभय आगरकर रिंगणात होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर यावेळी सर्व समीकरणे बदलली आहेत. कारण यंदा दिलीप गांधी यांचे तिकीट कापून डॉ. सुजय विखेंना तिकीट देण्यात आलं. सुजय विखेंनी विजयही मिळवला. त्यामुळे आता विखे पाटील सर्वच मतदारसंघात हस्तक्षेप करणार यात काही शंका नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप विरुद्ध शिवसेनेचे अनिल राठोड लढत होणार आहे. गेल्या पंचवार्षीकला 60.05 टक्के मतदान झाले तर यावेळी 54.50 टक्के झाले. त्यामुळे मतदानाचा कमी झालेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडतो हे पाहण गरजेचं ठरेल.

2) पाथर्डी-शेवगाव -

या मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळे विद्यमान आमदार आहेत. गेल्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना फाईट दिली होती. त्यात घुलेंचा पराभव झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मोनिका राजळे भाजपकडून तर त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप ढाकणे निवडणूक लढत आहेत. २०१४ ला या मतदारसंघात 72.86 टक्के मतदान झाले होते. तर यावेळी 67 टक्के मतदान झाले आहे.

3) कर्जत-जामखेड -

कर्जत-जामखेड या मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून भाजपचे मंत्री राम शिंदेंचं वर्चस्व आहे. विरोधकांना फार काही जादू करता आलेली नाही. मात्र, यंदा त्यांची लढाई शरद पवारांचे नातू रोहित पवारांसोबत आहे. ते राष्ट्रवादीकडून लढवत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यांचं लक्ष या लढतीकडे लागले आहे. गेल्या पंचवार्षीकला या मतदारसंघात 66.04 टक्के मतदान झाले होते. तर यावेळी मतदानाचा टक्का वाढला आहे. यंदा 73.98 टक्के मतदान झाले आहे.

4) श्रीगोंदा -

राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल जगताप हे या मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत. श्रीगोंदा मतदारसंघात भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते हे प्रबळ नेते आहेत. पाचपुते हे 25 वर्षांपासून आमदार होते. विशेष म्हणजे पाचपुते हे आतापर्यंत वेगवेगळ्या चिन्हावर निवडून आले. मात्र 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राहुल जगताप यांनी त्यांचा पराभव केला. यावेळी पाचपूते भाजपकडून लढवत असून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार निवडणूक लढवत आहेत. विशेष बाबा म्हणजे नागवडे गट आणि पाचपूते गटाचे यावेळी मनोमिलन झाल्याने भाजपची लढाई सोपी झाली आहे. २०१४ ची मतदानाची टक्केवारी ही 67.66 टक्के होती. तर यावेळी 67.66 टक्के आहे.

5) राहुरी विधानसभा -

राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचं वर्चस्व आहे. नगरच्या राजकारणात कर्डिलेंना किंगमेकर म्हणून ओळखलं जातं. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर विखे आणि कर्डिले दुरावले गेले आहेत. कारण सुजय विखेंविरोधात कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप उभे होते. त्यामुळे त्यांनी जावायालाच मदत केल्याचा आरोप आहे. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत कर्डिलेंबाबत विखे काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचं लक्ष आहे. शिवाजी कर्डीले यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या प्राजक्ता तनपुरे यांची मुख्य लढत आहे. २०१४ ला मतदानाची टक्केवारी 71.26 टक्के आहे तर यंदा 68.37 टक्के आहे.

6) पारनेर विधानसभा -

पारनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार विजय औटी प्रतिनिधीत्व करत आहेत. इथं भाजपला फारसा जनाधार नाही. विजय औटी गेल्या 15 वर्षांपासून एकहाती सत्ता गाजवत आहेत. सध्या ते विधानसभेत उपसभापती देखील आहेत. त्यांच्याविरुद्ध तगडा उमेदवार नाही. मात्र त्यांचे जुने कार्यकर्ते निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन त्याच्याविरूद्ध उभे ठाकले आहेत. त्यामुळे यंदा औटी विरुद्ध लंके असा सामना रंगत आहे. २०१४ साली 68.31 तर यावेळी 64.59 टक्के आहे.

7) अकोले विधानसभा मतदारसंघ

अकोले विधानसभा मतदार संघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे. अकोले विधानसभा मतदारसंघ मधुकर पिचड यांचा बालेकिल्ला आहे. हा मतदारसंघ सुरुवातीपासून काँग्रेसचा गड होता. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पिचड राष्ट्रवादीसोबत गेले. तेव्हापासून आत्तापर्यंत अकोले राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला. मधुकर पिचड यांनी अनेक वर्ष आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहिलं. 2014 साली मधुकर पिचडांनी आपले पुत्र वैभव पिचड यांच्यावर आमदारकीची जबाबदारी सोपवली. वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवत 20 हजारांच्या मताधिक्याने शिवसेनेचे मधुकर तळपदे यांचा पराभव केला. भाजपचे डॉ. किरण लहामटे यांनी पिचडांचा भाजप प्रवेश होताच राष्ट्रवादीच्या गोटात जाण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे पिचड विरुद्ध लहामटे सामना रंगत आहे. २०१४ ला या मतदारसंघात 67.56 टक्के मतदान झाले तर यावेळी 67.73 टक्के मतदान झाले आहे.

8) संगमनेर विधानसभा मतदारसंघ -

संगमनेर मतदारसंघ हा माजीमंत्री व सध्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. ते 1982 पासून सलग 6 वेळा आमदार राहिले आहेत. विरोधकांचं एकमत नसल्याने थोरात नेहमीच आघाडीवर राहिले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही बाळासाहेब थोरात यांनी 1 लाख 03 हजार 564 एवढी मतं घेऊन शिवसेनेचे जनार्दन आहेर यांचा 60 हजारांच्या फरकाने पराभव केला होता.

बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्मी लागली. तिकडे विखे पाटील भाजपवासी झाले. थोरात आणि विखे पाटील यांच्यातील संघर्ष पाहता विखे पाटील थोरातांसमोर मोठं आव्हान उभ करु पाहत आहे. शिवसेनेचे साहेबराव नवले विरुद्ध थोरात अशी लढत आहे. २०१४ ला 71.70 टक्के मतदान झाले होते तर यावेळी 71.20 टक्के मतदान झाले आहे.

9) शिर्डी विधानसभा मतदार संघ -

शिर्डी विधानसभा मतदारसंघावर विखे पाटील घराण्याचं निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे. मागील निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील मोदी लाटेतही 70 हजारांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले. त्यांनी शिवसेना उमेदवार अभय शेळके यांचा पराभव केला होता. विखे पाटील आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. विखे पाटलांनी भाजप प्रवेश केल्यानंतर शिर्डी मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी फक्त नावाला शिल्लक राहिली आहे. यावेळी कांग्रेसचे सुरेश थोरात विरुद्ध भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांचा सामना रंगणार आहे. २०१४ ला या मतदारसंघात 76.85 टक्के मतदान झाले होते तर यावेळी 70.67 टक्के मतदान झाले आहे.

10) कोपरगाव विधानसभा मतदारसंघ-
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे आणि कोल्हे यांची परंपरागत लढत आहे. कधी कोल्हे तर कधी काळेंकडे सत्ता राहिली. तिसरी शक्ती उदयास येऊ द्यायची नाही असं जणू समीकरणच बनलं आहे. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते. पक्ष स्थापनेपासून ते शरद पवारांसोबत होते. 35 वर्ष आमदार राहिलेल्या शंकरराव कोल्हेंना तीनदा मंत्रीपद मिळाले.
2014 च्या निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांनी मुलाऐवजी त्यांच्या सूनबाई स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपच्या तिकीटावर सौ. कोल्हे यांनी निवडणूक लढवली आणि 20 हजार मतांनी त्या विजयी झाल्या.
युतीकडून भाजपच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे, तर आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २०१४ ला 79.95 टक्के मतदान झाले होते तर, यावेळी 72.76 टक्के मतदान झाले आहे.

11) श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ -

काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे हे विद्यमान आमदार आहेत. 2009 साली हा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव झाला आणि ससाणे समर्थक भाऊसाहेब कांबळे सलग दोनवेळा आमदार झाले. कांबळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. कांबळे शिवसनेकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे लहू कानडे उभे ठाकले आहेत. २०१४ ला या मतदारसंघात - 68.85 टक्के मतदान झाले आहे. तर यावेळी 63.93 टक्के मतदान झाले आहे.

12) नेवासा विधानसभा मतदारसंघ -

भाजपचे बाळासाहेब मुरकुटे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे नेवासा तालुक्यात भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख. लोकसभा निवडणुकीत वंचितचे संजय सुखदान यांनी चांगली मते मिळवली होती. संजय सुखदान नेवासा येथील असल्याने त्यांचंही नाव चर्चेत आहे. नेवासे मतदारसंघांमध्ये शेतकरी क्रांती पक्षाचे शंकरराव गडाख यांनी विद्यमान आमदार भाजपाचे बाळासाहेब मुरकुटे यांच्यासमोर कडवे आव्हान उभा केला आहे. बाळासाहेब मुरकुटे यांना गडाख चितपट करतील अशीच मोठी चर्चा नेवासा-शेवगाव तालुक्यामधून होताना दिसत आहे. या निकालाकडे ही जिल्ह्याचं लक्ष लागणार आहे या ठिकाणी आघाडीने उमेदवार न देता गडाख यांना पाठिंबा दिलेला आहे. 2014 ला या मतदारसंघात झालेली टक्केवारी ही 74.50 टक्के होती तर यावेळी ती 78 टक्के मतदान झाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या गेल्या काही महिन्यांत मोठी राजकीय उलथापालथ झालेली पहायला मिळत आहे. पुन्हा एकदा विखे विरुद्ध थोरात आणि विखे विरुद्ध पवार असा कलगीतुरा पहायला मिळत आहे. कर्जत-जामखेड या मतदारसंघातील रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे जरी असले तरी ही लढाई खर तर विखे विरुद्ध पवार अशीच आहे. एकुण परिस्थिती पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत आघाडीला फार फार तर एका जागेचा तोटा होण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेला श्रीरामपूर मतदारसंघातील भाऊसाहेब कांबळे यांच्या रुपाने गेल्या वर्षीच्या तुलनेत एक जागा जास्त मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस एक जागा गमावण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details