अहमदनगर Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथील चार महिलांच्या खून प्रकरणात शिक्षा भोगलेला मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (वय 58) यानं रविवारी (10 डिसेंबर) सायंकाळी एका अल्पवयीन मुलीची छेड काढत बेदम मारहाण केली. या घटनेमुळं संतप्त झालेल्या जमावानं अण्णा वैद्यला मारहाण केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अकोले पोलीस त्याला उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या प्रकरणानंतर अकोले तालुक्यात एकच खळबळ उडालीय.
कोण होता अण्णा वैद्य : काही वर्षांपूर्वी विद्युत मोटार केबल प्रकरणात गावकऱ्यांनी अण्णा वैद्य याला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. त्यानंतर त्याच्या शेतात घेतलेल्या शोध मोहिमेमध्ये चार महिलांचे सांगाडे सापडल्यानं साखळी खून प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर चार महिलांचा खून करून त्यांचे मृतदेह शेतात पुरून ठेवल्याच्या आरोपावरून वैद्य याच्या विरोधात संगमनेरच्या जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. वैद्य याला एका महिलेच्या खून प्रकरणी संगमनेरच्या जिल्हा न्यायालयानं ठोठावलेली शिक्षा उच्च न्यायालयात रद्द करण्यात आली होती. दुसऱ्या एका खून प्रकरणात न्यायालयानं त्याची निर्दोष मुक्तता केली होती. तर तिसऱ्या खून प्रकरणात न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसंच अन्य एक खून खटला न्यायालयात प्रलंबित आहे. शिक्षा भोगून आल्यानंतर वैद्य आपल्या गावी सुगाव खुर्द येथे राहत होता.