अहमदनगर(शिर्डी) :कर्नाटक राज्यातील उडपी येथील साईभक्त सुकुमार पुजारी 29 जुलैला आपल्या कुटुंबियांसोबत शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी पुजारी कुटुंबीय आपल्या चारचाकी गाडीच्या डिक्कीतून सामान काढत असताना, पुजारी यांच्या पत्नीच्या हातातून अज्ञात व्यक्तीने दुचाकीवर येवून पर्स हिसकावली. पुजारी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. शिर्डी पोलिसांनी दुचाकी नंबरच्या आधारे एक तासात आरोपी वसमी दगुभाई शेखला मुद्देमालासह अटक केली. तर भाविकांचा मुद्देमाल परत केल्याने शिर्डी पोलिसांचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी आरोपीला पकडले : साईभक्त सुकुमार पुजारी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत ताबडतोब शिर्डी पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली. आरोपी वसमी दगुभाई शेखच्या घरी पोलीस पोहचले. त्यावेळी वसमी पर्समधील पैसे मोजत असताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडून अटक केली आहे. आरोपी वसमी दगुभाई शेख हा कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील रहिवासी आहे. तो साईबाबा संस्थानच्या चौकशी विभागातील कर्मचारी असल्याची माहिती, शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली आहे.
गाडीच्या नंबरवरुन आरोपीचा शोध लावला आहे. पोलीस आरोपीच्या घरी गेले त्यावेळी तो चोरी केलेल्या पर्समधील पैसे मोजत बसला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला लगेच अटक केली आहे. आरोपी हा साईबाबा संस्थानच्या चौकशी विभागातील कर्मचारी आहे - नंदकुमार दुधाळ, पोलीस निरीक्षक, शिर्डी पोलीस ठाणे