अहमदनगर :अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसात हत्येच्या घटना वाढल्या आहेत. अशातच नगरमध्ये दुहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. राहुरी तालुक्यातील कात्रड येथील सागर साळवे आणि नुतन दांगट या दोघांचे लग्न झाले होते. दोघेही एकाच गावातील आहेत. आरोपी सागर हा घरजावई होता. घरजावई म्हणून राहणे आरोपीला पसंत नव्हते. पत्नी माहेरी राहत असल्याने दोघांमध्ये वाद होता. सध्या धोंड्याचा महिना सुरू असल्याने जावई सागरला सासू सुरेखा दांगट यांनी धोंड्याच्या जेवणासाठी दुपारी बोलावले होते.
कौटुंबिक वाद थेट विकोपाला :मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दुपारी धोंड्याच्या जेवणासाठी गैरहजर राहिला होता. तो रात्री उशिरा घरी आल्यावर कौटुंबिक वाद सुरू झाले. हा वाद थेट विकोपाला गेला. रात्री अकरा वाजता आरोपीने रागाच्या भरात पत्नी नुतन आणि सासू सुरेखा दांगट यांच्या डोक्यात लोखंडी रॉडचे प्रहार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नी व सासूला सोडून आरोपी त्याच्या दीड वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन घराबाहेर पडला.
आरोपीच्या कुटुंबीयांना शंका :कात्रड गावातच आरोपीचा भाऊ गणेश साबळे यांचे कुटुंब राहते. रात्री साडेअकरा वाजता आरोपी सागरने त्याची दीड वर्षाची मुलगी भक्ती हिला भाऊ गणेश, भावजय पल्लवी आणि आई ताराबाई साबळे यांच्या स्वाधीन केले. एवढ्या रात्री मुलीला घेऊन कशाला आलास? असे भावाने विचारल्यावर मुलगी रडत होती म्हणून तिला आणले, असे सांगून आरोपी लघुशंकेच्या बहाण्याने फरार झाला. भावाने आरोपीला फोन लावल्यावर मोबाईल 'स्वीच्ड ऑफ' लागला. आरोपीच्या कुटुंबीयांना शंका आल्याने भाऊ, भावजय यांनी आरोपीच्या सासूचे घर गाठले. त्यानंतर घटना समोर आली. गणेश साबळे यांनी तत्काळ राहुरी पोलीस ठाण्यात माहिती कळविली. पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपूजे, सहायक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे, उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घरातील दोन्ही मृतदेह नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.