अहमदनगर - रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळ्या बाजाराविरोधात जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी विविध ठिकाणी धडक कारवाया केल्या आहेत. इंजेक्शनची जास्त दराने विक्री करणारे तीन आरोपी, वाहन आणि तीन रेमडेसिवीर इंजेक्शन असा एकूण ७ लाख ३२ हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दोन स्वतंत्र प्रकरणात तोफखाना आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हेमंत दत्तत्राय कोहक (रा.बोल्हेगाव), भागवत मधुकर बुधवंत (रा. आदर्श कॉलनी, बोल्हेगाव) आणि आदित्य बाबासाहेब म्हस्के (रा. माताजीनगर, एमआयडीसी) या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर, चार आरोपी फरार झाले आहेत.
रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्यांवर गुन्हे शाखेची धडक कारवाई झाली शहरात होतोय रेमडेसीवरचा काळाबाजार -
२ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराकडून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळ्याबाजाराविषयी माहिती मिळाली होती. नगर शहरातील बालिकाआश्रम परिसरातील तारडे हॉस्पिटल व एमआयडीसी भागातील काकासाहेब म्हस्के मेडीकल कॉलेज परिसरात काही व्यक्ती आर्थिक फायद्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची जास्त दराने विक्री करत आहेत, अशी ही माहिती होती. या आधारे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक दिवटे यांनी कारवाई केली.
तोफखाना पोलीस हद्दीतील कारवाई -
सोमनाथ दिवटे आणि अन्न व औषध प्रशासनचे निरीक्षक विवेक खेडकर यांच्यासह पथकातील सहायक पोलीस निरीक्षक मिथून घुगे, पोलीस उपनिरीक्षक आदींनी रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर बनावट ग्राहकाच्या मध्यस्थीने संपर्क केला. रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत विचारपूस केली असता समोरील व्यक्तीने एका इंजेक्शनची किंमत २७ हजार रुपये सांगितली. तारडे हॉस्पिटल परिसरात पोलिसांनी एक बनावट ग्राहक इंजेक्शन खरेदीसाठी पाठवला. त्यानंतर सापळा लावून आरोपी हेमंत दत्तात्रय कोहक याला स्कार्पिओ गाडीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून पॉलीफार्मा कंपनीचे एक रेमडेसिवीर इंजेक्शन, एक मोबाईल व स्कार्पिओ जिप असा एकूण ७ लाख १२ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात महेश दशरथ मते (रा. बरबडे वस्ती, तपोवन रोड, अहमदनग), प्रदीप मारुती मगरव आणि अमर शिंदे (दोघे रा. तागड वस्ती, तपोवन रोड, अहमदनगर) आरोपी असून ते फरार आहेत.
एमआयडीसी पोलीस हद्दीतील कारवाई -
काकासाहेब म्हस्के कॉलेज परिसरात रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणासाठी येणाऱ्या व्यक्तीच्या मिळालेल्या मोबाईल क्रमांकावर बनावट ग्राहकाच्या मध्यस्थीने संपर्क केला असता त्याने एका इंजेक्शनची किंमत ३२ हजार सांगितली होती. या प्रकरणात भागवत मधूकर बुधवंत (वय- २० वर्षे, रा. आदर्श कॉलनी, बोल्हेगाव, अहमदनगर) आणि अदित्य बाबासाहेब म्हस्के (वय- २१ वर्षे, रा. माताजीनगर, एमआयडीसी, अहमदनगर) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सनफार्मा कंपनीचे एक व सिप्ला कंपणीचे एक अशी दोन रेमडेसिवीर इंजेक्शन, एक मोबाईल असा एकूण वीस हजार ४५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अंकीत कालिका मोर्य (रा. गुरुकृपा कॉलनी, एमआयडीसी, अहमदनगर) हा आरोपी फरार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.