शिर्डी :शेळी चोरल्याच्या संशयातून मागासवर्गीय तरुणांना झाडाला उलटं बांधून मारहाण करण्यांविरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांकडून युवराज नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शेळी चोरल्याच्या संशयातून चार तरुणांना मारहाण केल्यामुळे दोन गटात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
- शेळी आणि कबुतर गेलं चोरीला :श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील नाना गलांडे याची शेळी आणि काही कबुतरं काही दिवसापूर्वी चोरीला गेले होते. या शेळीचा शोध घेऊनही ती आढळून न आल्यानं नाना गलांडे आणि त्याच्या साथिदारानं गावातील काही तरुणांवर शेळी चोरीचा आळ लावला होता.
झाडाला उलटं लटकवून तरुणांना मारहाण :शेळी आणि कबुतरं चोरीच्या संशयावरून शुक्रवारी सकाळी चार मागासवर्गीय तरूणांना त्यांच्या घरातून उचलून नेण्यात आलं होतं. या तरुणांना कपडे काढून झाडाला उलटं लटकवून आरोपी युवराज नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे यांनी अमानुष मारहाण केली. या मारहाणीत तरुणांना शेळीची चोरी केल्याबाबतची माहिती वदवून घेण्यात आली. मात्र तरुणांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानं मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पीडित तरुणाच्या आईला धक्काबुक्की :शेळी चोरल्याच्या संशयातून तरुणांना मारहाण करण्यात येत असल्याची माहिती पीडित तरुणाच्या आईला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी पीडित तरुणाला सोडण्याची विनवणी केली. मात्र मारहाण करणाऱ्या नराधमांनी पीडित तरुणाच्या आईलाही धक्काबुक्की केली. त्यामुळे घटना आणखीच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- कामगार रुग्णालयात केलं दाखल :शेळी चोरीच्या आरोपातून तरुणांना झाडाला बांधून मारहाण केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या मारहाणीत पीडित तरुण गंभीर जखमी झाला आहेत. त्यांना श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेतील नराधमांना तात्काळ अटक करण्याची मागणी रिपईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केली आहे.