अहमदनगर- अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण गुलाबराव काळे यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंग, बळजबरीने कार्यालयात प्रवेश करून दमदाटी करणे या कारणास्तव गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे विश्वासातील कार्यकर्ते मानले जातात. काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण-
काँग्रेसचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काही कार्यकर्त्यांसोबत एमआयडीसी येथील आयटी पार्कला नुकतीच भेट दिली होती. यावेळी त्यांनी येथील एका खाजगी फायनान्स, तसेच कंपनीचे कॉल सेंटर इथे प्रवेश करून येथील तक्रारदार महिलेचा हाथ पकडून ओढले आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच कार्यालयातील महिलांना दमदाटी करत मी काँग्रेस पक्षाचा शहर जिल्हा अध्यक्ष आहे, माझ्या नादी लागू नका, सगळे धंदे बंद करा, मी तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली अशी तक्रार पीडित महिलेने दिली आहे. या तक्रारी वरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आईपीसी कलम 452, 354,504,506 नुसार किरण गुलाबराव काळे आणि इतर आठ ते दहा जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेअंमलदार थोरवे पुढील तपास करत आहेत.
किरण काळे - आमदार जगताप संघर्ष टोकाला -
किरण काळे अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. मात्र त्यांचा राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांच्याशी विविध कारणावरून संघर्ष राहिला. काळे यांनी आ.जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत. खा.सुप्रिया सुळे यांच्याशी काळे यांचे जवळचे संबंध असले तरी निवडणूकीच्या राजकारणात जगताप यांनी बाजी मारत दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत बाजी मारल्याने काळे एकाकी पडले. अशात त्यांनी मध्यंतरी राष्ट्रवादी सोडत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमधे ते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. शहरात एक काँग्रेस आणि चार विविध नेतृत्वाला मानणारे नेते अशी परस्थिती आहे. शहरात काँग्रेसचा महापौर-आमदार होईल असा आशावाद मध्यंतरी थोरात यांनी मांडत काळे यांना बळ देण्याचा प्रयत्न केला. यातून नगर शहरात काळे यांनी सतत आ.संग्राम जगताप यांच्या विरोधात पत्रकबाजी करत आरोपांचा सपाटा लावला आहे. यातून जगताप-काळे संघर्ष वाढला आहे. अशात आ.जगताप यांनी गेल्या वर्षी आयटी पार्कचे पुनरुज्जीवन करण्याचा मानस ठेवत अनेक कार्यक्रम घेतले, त्यातून काहींना रोजगार मिळाला. या पार्श्वभूमीवर काळे यांनी दोन दिवसांपूर्वी एमआयडीसी मधील आयटी पार्कला कार्यकर्त्यांसह भेट देत तेथील परस्थितवर पत्रक काढून आयटी पार्कची दुरवस्था, रोजगार देऊन थकलेले पगार असे मुद्दे उपस्थित करत आ.जगताप यांच्यावर टीका केली. त्यानंतर लगेचच काळे यांच्या आयटी पार्कच्या भेटी दरम्यान त्यांनी भेट दिलेल्या एका खाजगी फायनान्स आणि कॉल सेंटर मधील एका महिलेने किरण काळे यांच्या विरोधात रात्री तक्रार दाखल करत विनयभंगाचा आणि दमदाटी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान काळे आज पत्रकार परिषद घेणार असून त्यात व्हिडीओ सीडी द्वारे आयटी पार्क भेटीचा संपूर्ण व्हिडीओ प्रसारित करणार आहेत.