अहमदनगर -सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलोनी चौकातील पालिकेच्या लसीकरण केंद्रावर चांगलाच राडा झाला. या दरम्यान झालेल्या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र तथा भैय्या गंधे यांना जमावाकडून धक्काबुक्की करत असल्याचे दिसत आहे. मात्र, गंधे यांनी या घटनेचा इन्कार केला आहे.
सावेडी येथील लसीकरण केंद्रावर गोंधळ हेही वाचा -कल्याणमध्ये तरुणीसह २ तरुणांना भर रस्त्यावर बेल्टने मारले, VIDEO व्हायरल
- दोन गटाच्या गोंधळात गंधेंना धक्काबुक्की -
महानगरपालिकेच्या सावेडी उपनगरातील स्वर्गीय प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्रात लसीकरण सुरू होते. सकाळी दुसरा तर दुपारच्या वेळेस पहिला अशा पद्धतीने लसीकरण केले जाणार होते. दुसरा डोस घेण्यासाठी केंद्रावर सकाळी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. दुपारी केंद्राबाहेर अचानक गोंधळ सुरू झाला. दुपारी पहिला डोस घेण्यासाठी भाजपचे गंधे यांनी काही लोकं आणल्याचा आरोप या वेळी करण्यात येत होता. केंद्राच्या प्रवेशद्वारासमोरच मोठा जमाव यावेळी जमलेला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये केंद्राबाहेर जमलेल्या जमावाच्या मध्यभागी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे हे दिसत आहेत. प्रचंड गोंधळात गंधे यांना धक्काबुक्की केल्याचे व्हायरल व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. तसेच काही जण हातवारे करत एकमेकांना लोटालोटी करतानाही दिसत आहेत.
- लसीकरणात आरोग्य सेवकांवर राजकीय दबाव-
या घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत लसीकरण सुरळीत केले. नगर शहरात लसीकरणात राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा वारंवार आरोप होत आहे. यामध्ये अनेक नगरसेवक आपल्या प्रभागांमध्ये लसीकरण आयोजित करा यासाठी महानगर पालिका प्रशासनावर दबाव वाढवतात. त्याच पद्धतीने आपल्या जवळचे, ओळखीचे त्याचबरोबर कार्यकर्ते यांना लसीकरण प्राधान्य द्यावं यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.
- महेंद्र गंधे यांच्याकडून धक्काबुक्कीचा इन्कार-
दरम्यान, सावेडी लसीकरण केंद्रावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंदे यांनी फोनवरून माहिती दिली. ते म्हणाले, लसीकरण केंद्रावर काही नागरिकांमध्ये गोंधळ सुरू होता. केंद्रावरील वाद मिटवण्यासाठी आपण गेलो होतो. मात्र आपल्याला धक्काबुक्की झाली नाही, असे गंधे यांनी सांगितले आहे.
- घटनास्थळी राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते-
त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लसीकरण केंद्रावर दुपारी गोंधळ सुरू झाल्यानंतर आपल्याला माहिती मिळाली. यानंतर आपण त्या ठिकाणी वाद मिटवण्यासाठी गेलो असता तिथे प्रचंड गोंधळ सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण नागरिकांची समजूत काढल्यानंतर गोंधळ थांबला असेही बोरकर म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अजिंक्य बोरकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्यात या वेळी मोठी शाब्दिक बाचाबाची झाली आणि या दरम्यान महेंद्र गंधे यांना नागरिकांनी धक्काबुक्की करत मोठा गोंधळ घातल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा -मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील भीषण अपघाताचा थरारक VIDEO, दोन ट्रकमध्ये कारचा झाला चुराडा