अहमदनगर- लोकसभा निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाली आहे. आजचा दिवस नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांसाठी राजकीय भूमिकावार ठरणार आहे. आज एकीकडे युती-आघाडीने आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका बोलावून घटकपक्ष, नेते-कार्यकर्त्यांचा समन्वय साधण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे भाजप विद्यमान खासदार दिलीप गांधी समर्थकांनीही निष्ठावंताचा एक मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात खा. गांधी आणि त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
सुवेंद्र गांधी यांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असून सुवेंद्र हे निवडणुकीत उतरणार असे बोलले जात आहे. तसे झाल्यास सुजय-संग्रामनंतर अजून एक युवा चेहरा या निवडणुकीच्या मैदानात दिसू शकेल. मुख्य म्हणजे खा. गांधी आज नेमकी काय भूमिका घेतात याकडे युती आणि आघाडीचेही लक्ष असणार आहे.
युतीच्या वतीने भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात प्रचाराची रणनीती ठरवण्यात येणार आहेत. सुजय विखेंना आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे चांगलेच नाराज झालेले आहेत. खासकरून राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांची प्रचंड नाराजी समोर येत आहे. पुत्रप्रेमापोटी त्यांनी डॉ. सुजयच्या प्रचारासाठी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी मुंबईत संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला त्यांची अनुपस्थिती ही बरचकाही सांगून जाणारी आहे.