अहमदनगर - गेल्या महिनाभरापासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मौनव्रत आंदोलन सुरू आहे. आज (शुक्रवारी) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अण्णा यांची भेट घेत अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अण्णा ज्या मागणीसाठी मौनव्रत आंदोलन करत आहेत, त्याला माझा पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया, यावेळी केंद्रीय मंत्री आठवले यांनी दिली. अण्णा निर्भयाचे आरोपी फासावर लटकत नाही तोपर्यंत मौनव्रत आंदोलनाला बसत आहेत.
अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राळेगण सिध्दी येथे त्यांची भेट घेत विचारपूस केली. अत्याचाराच्या घटनेची सुनावणी जलगती न्यायालयात चालवून आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी अशी कायद्यात तरतूद आहे. मात्र, असे असताना देखील निर्भयाच्या आरोपींना शिक्षा देण्यास आणि त्याच्या अंमलबजावणीस तब्बल सात वर्ष लागले. तरी अद्यापही फाशीची अंमलबजावणी झालेली नाही.