महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाशिवआघाडीच्या भवितव्यावर नगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षांचे भवितव्य.. - Blasaheb Thorat latest news

अहमदनगर जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण महिला या वर्गासाठी आरक्षण घोषित झाले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे जिल्हा परिषदेवर वर्चस्व कोणाचे, याबाबत आता उत्सुकता आहे.

जिल्हा परिषदेवर वर्चस्व कोणाचे, याबाबत आता उत्सुकता

By

Published : Nov 19, 2019, 3:13 PM IST


अहमदनगर - महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची सोडत आज घोषित झाली असून त्यात क्षेत्रफळाने राज्यात सर्वात मोठ्या असलेल्या अहमदनगर जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण महिला या वर्गासाठी आरक्षण घोषित झाले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे जिल्हा परिषदेवर वर्चस्व कोणाचे, याबाबत आता उत्सुकता आहे.

सध्या माजी विरोधीपक्ष नेते तथा आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे या अध्यक्षपदावर विराजमान आहेत. तांत्रिकरित्या त्या काँग्रेसच्या जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष असल्या तरी त्यांचा भाजप वावर सर्वश्रुत होता.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्याप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होऊ शकेल, असे संकेत नुकतेच दिलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे थोरात आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे जिल्हा परिषदेवर वर्चस्व राहील, हे स्पष्ट झाले आहे.. या निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेत भाजपला दूर ठेवण्याचीच शक्यता आहे.

जिल्हा परिषदेत सध्या शालिनी विखे पाटील अध्यक्ष आहेत. त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पुढील महिन्यांत संपत आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी १९, काँग्रेस २३, भाजप १४, शिवसेना ७, क्रांतिकारी शेतकरी पक्ष ५, महाआघाडी २, कम्युनिष्ट पक्ष १, शेतकरी विचार मंच १ व जनशक्तीचा १ असे बलाबल आहे. एकूण ७३ सदस्य आहेत.

आरक्षणावर भिस्त

जिल्हा परिषदेत यावूर्वी २०११ मध्ये सर्वसाधारण आरक्षण निघाले होते. त्यानंतर २०१३ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, २०१६ मध्ये सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाले होते. या वर्षी आता पुन्हा एकदा सर्वसाधारण महिला हे आरक्षण निघाले आहे. सर्वसाधारणसाठी महिला आरक्षण घोषित झाल्याने राष्ट्रवादीकडून शेवंगावच्या राजश्री घुले अध्यक्ष होऊ शकतात. विधानसभेला चंद्रशेखर घुले यांनी प्रताप ढाकणे यांना उमेदवारी साठी केलेली मदत ती यासाठीच समजली जातेय. काँग्रेसकडून सर्वसाधारणसाठी अजय फटांगरे यांना संधी मिळू शकते.

रोहित पवार की थोरातांचे वर्चस्व..!!

राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष या पदांसाठी उमेदवार ठरवू शकतील. कारण राज्यात भाजपला दूर ठेवून सत्ता स्थापनेचे घाटत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला जिल्हा परिषदेतही दूर ठेवण्याचे नियोजन होत आहे. त्यासाठी शिवसेनेची आपसूक मदत होणार आहे. ही घडामोड म्हणजे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना जिल्ह्याच्या राजकारणात मोठी धक्का देणारी ठरणार आहे..

ABOUT THE AUTHOR

...view details