अहमदनगर-जामखेड तालुक्यातील खर्डा येथील खैरी प्रकल्पाशेजारील काही गावांमधून अवैध असा एकूण १०० ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला. महसूल व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या कारवाई करत हा साठा जप्त केला आहे. मागील आठवड्यात तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी अशीच धडक कारवाई करून वाळूचोरीसाठी वापरले जाणारे दोन डम्पर व आठ टॅक्ट्रर जप्त केले होते. या कारवाईमुळे तालुक्यातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
जामखेडच्या खर्डा येथील खैरी प्रकल्पातून लोणी, बाळगव्हाण, वाकी, सातेफळ या परिसरात खैरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी केली जाते. तसेच, या परिसरातील गावांमध्ये १०० ब्रास वाळूसाठा असल्याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्याशी चर्चा करून सदर वाळूसाठे जप्त करण्याच्या दृष्टीने महसूल व पोलीस प्रशासनाचे पथक तयार केले. त्यानुसार दुपारी दोन वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कारवाई करत त्यांनी हा वाळूसाठा जप्त केला.