अहमदनगर- नेवासे तालुक्यातील सोनई, करजगावसह 18 गावांची पाणी योजना तातडीने सुरू करावी व ती योजना सुरू होण्यापर्यंत या सर्व गावात पाण्याचे टँकर चालू करावेत, कामे पूर्ण झाली नसताना ठेकेदाराला दिलेल्या बिलाची चौकशी करावी, योजनेचे काम पूर्ण करून 1 वर्ष योजना प्राधिकरणाने चालवावी या मागण्यांसाठी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 500 ग्रामस्थांनी नगर येथील जीवन प्राधिकरणाच्या ऑफिससमोर उपोषणाला बसले आहेत. यावेळी काही आंदोलक आक्रमक होत प्राधिकरणाच्या इमारतीवर चढून घोषणाबाजी केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.
या सर्व प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1 जुलै 2019 पासून बंद केलेली पाणी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी गडाख यांच्यासमवेत 18 गावचे सरपंच व ग्रामस्थांनी सोनई येथे रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यात जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत लेखी आश्वासन दिले होते. परंतु यावर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे हे सर्व ग्रामस्थ नगर येथे उपोषणाला बसलेले आहेत. या मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.