अहमदनगर - नदीपात्रातील वाळू प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराची व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी धानोरे येथील सामाजिक कार्यकर्ते सूर्यभान दिघे व आदिनाथ दिघे यांनी अनोखे आंदोलन केले. गांधी जयंतीच्या दिवशी ‘हे राम’ म्हणत स्मशानात उपोषण करण्यात आले.
गांधी जयंती दिनी स्मशानभूमीत आंदोलन; महसूल विभागातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी
जवळपास ७४ लाख रुपयांची वाळू अवैध मार्गाने चोरीस गेली असताना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे २ ऑक्टोबर गांधी जयंती रोजी सकाळी दहा वाजता धानोरे येथील स्मशानात सरपण रचून त्यावर झोपले आणि ‘हे राम’ म्हणत आंदोलन पुकारण्यात आले.
धानोरे गावातील प्रवरा नदीपात्रातील नदीतून गेल्या काही वर्षांपासून महसूल विभागातील अधिकारी व तलाठी यांनी संगनमताने वाळू तस्करांना मदत करत प्रचंड प्रमाणात वाळूचा उपसा केला. जवळपास ७४ लाख रुपयांची वाळू अवैध मार्गाने चोरीस गेली असताना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मागील वर्षी १५ जुलैला बापूसाहेब दिघे यांनी धानोरे येथील तलाठी कार्यालयासमोर उपोषण केले होते. तत्कालीन तलाठी यांनी या वाळू चोरी प्रकरणी पंचनामे करून संबधीतांकडून वसूली करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर एका वर्षाचा कालावधी उलटूनही अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कोणतीही चौकशी न करता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप दिघे यांनी केला.
वाळू चोरी प्रकरणावर कोणतीच कारवाई होत नसल्याने दिघेंनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता धानोरे येथील स्मशानात सरपण रचून त्यावर झोपले आणि ‘हे राम’ म्हणत आंदोलन पुकारले. आंदोलनाला मुळा प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समीतीने देखील पाठींबा दिला आहे. प्रवरा नदीपात्रातील ७४ लाखांची वाळू चोरीचे पंचनामे करूनही सबंधीतांवर कारवाई करण्यासाठी प्रशासन टाळाटाळ का करतात, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्ये आदिनाथ दिघे यांनी यावेळी केला.