शिर्डी- राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेऊन गुरुवारी कोव्हिड केअर सेंटर सुरू केले आहे. या कोव्हिड केअर सेंटरमध्ये १०० खाटांची सोय करण्यात आली आहे. हे कोव्हिड सेंटर संभाव्य कोरोनाबाधित रुग्णांना चांगल्या सोई-सुविधा देईल, असा विश्वास माजी मंत्री व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष मधुकर पिचड यांनी व्यक्त केला.
'अगस्ती कारखान्यातर्फे उभे केलेले कोव्हिड सेंटर चांगली सेवा देईल' अकोले शहरापासून एक किलोमीटर अंतरावर रेडे शिवारात 100 खाटांचे सेंटर विठ्ठल लॉन्स येथे सुरू करण्यात आले. अगस्ती कारखान्याने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या सेंटरचा लोकार्पण सोहळा गुरुवारी दुपारी पार पडला, त्यावेळी पिचड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, तहसीलदार मुकेश कांबळे ,आरोग्य अधिकारी डॉक्टर इंद्रजीत गंभीरे, गिरजाजी जाधव, यशवंतराव आभाळे, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर राव घुले, कारखान्याचे मुख्य लेखापाल एकनाथ शेळके, मुख्य अभियंता नितीन बंगाळ, सुधाकरराव देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे आदी मान्यवर व्यासपीठावर होते.पिचड म्हणाले की, हे कोव्हिड सेंटर सुरू करणे ही आनंदाची गोष्ट नाही. पण नियतीने निमंत्रित केलेले कोरोनाचे संकट हे आपल्यापुढे वाढून ठेवल्याने हे सेंटर सुरू करण्याला अगस्ती कारखान्याने सामाजिक बांधिलकी म्हणून प्राधान्य दिले आहे. या सेंटरला कोणतीही अडचण येणार नाही. तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार व देखरेखीखाली हे केंद्र आपली आरोग्य सुविधा देण्याची भूमिका चोख बजावील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वर्षातील ऊस तोडणी हंगाम तोंडावर आला आहे. या काळामध्ये येणाऱ्या ऊस तोडणी कामगारांसाठीसुद्धा या सेंटरकडून उत्तम रीतीने सहकार्य दिले जाईल. तसेच संभाव्य कोरोना बाधितांवर योग्य उपचार केले जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शरद पवारांचे यापूर्वीच आवाहन-
राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने रुग्णालयांवर प्रचंड ताण आहे. अनेक ठिकाणी खाटा शिल्लक नसल्याने रुग्णांची हेळसांड होते. वेळेत उपचार न झाल्याने रुग्णांचा मृत्यूदर वाढत आहे. हे टाळण्यासाठी सहकारी कारखाने, संस्थांनी रुग्णालये सुरू करावित, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख, खासदार शरद पवार यांनी केले होते. त्यावर सांगलीच्या वसंतदादा साखर कारखान्याने तत्काळ १०० खाटांचे कोव्हिड रुग्णालय सुरू केले आहे.