अहमदनगर - जिल्ह्यातील वाढती कोरोनाची रुग्णसंख्या बघता पुन्हा लॉकडाऊन करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली होती. मात्र, त्याकडे पालकमंत्र्यांसह प्रशासनाने पाठ फिरवली. त्यामुळे मी एकटा पडलो आहे, प्रशासन माझे ऐकत नाही, असा आरोप सुजय विखेंनी केला आहे. सत्तेत नसल्याने हतबल असल्याचे ते म्हणाले.
डॉ. सुजय विखे पाटील, खासदार नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाच्या मुद्यावरून शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.
विखे फाऊंडेशनचे विळद इथे कोविड सेंटर आहे. या ठिकाणी 24 तासांत तब्बल 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. कारण नगर शहरातील शासकीय आणि खासगी कोविड सेंटरमध्ये त्यांना जागा मिळाली नाही. यामुळे शहरात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा आरोप खासदार विखेंनी केला. रुग्णांना बेड मिळत नाही, रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत किमान पाच दिवसांच्या लॉकडाऊनची मागणी केली होती. मात्र, प्रशासन ऐकायला तयार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन प्रतिकात्मक व्हावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे अनेक लोकप्रतिनिधी गर्दी जमवून विविध कामांचे उद्घाटन करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. जिल्ह्यातच आमदार रोहित पवार रोज विविध कार्यक्रम घेत गर्दी जमवून उद्घाटन करत फिरत आहेत. त्यामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनाला विरोध करणाऱ्यांनी अगोदर आपल्या लोकप्रतिनिधींना गर्दी न करता उद्घाटने न करण्याचा सल्ला द्यावा, असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला.