अहमदनगर: राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री यांनी परिसरातील महिला परिवार आणि नागरिकांशी संवाद साधला. छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर अचानक काही समाजकंटकांनी दगडफेक केली. यानंतर मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली होती. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या दंगलीमध्ये अल्पवयीन मुलांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. त्यामुळे जाणीवपूर्वकपणे अल्पवयीन मुलांना पुढे केले जाते का? याचाही तपास पोलीस करत आहेत.
अकोल्यामध्ये दोन गटांत हाणामारी: अकोला शहरात काल सोशल मीडियावरील एका पोस्टवरून दोन गटांमध्ये जातीय तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर हे दोन गट समोरासमोर आले आणि त्यांच्यात प्रचंड दगडफेक झाली. या घटनेमध्ये दहा जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक वाहनांचे देखील नुकसान झाले. दंगलीनंतर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अश्रुधुराचा देखील वापर करण्यात आला. या प्रकरणी आत्तापर्यंत सुमारे 30 जणांना अटक करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातही दगडफेक: अकोल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये देखील काल दगडफेकीची घटना घडली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ही दगडफेक झाली. या घटनेमध्ये बंदोबस्तावर असलेले 4 पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आत्तापर्यंत 102 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 तुकड्या शेवगावमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आत्तापर्यंत 50 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.