अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यात महसूल पथकाने सलग दोन दिवस अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटीवर कारवाई केली. कारवाई दरम्यान, वडगाव शिंदोडी मधून 4 बोटी, म्हसे मधील 8 बोटी तसेच माठमधील 13 बोटी जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून नष्ट करण्यात आल्या.
वाळू तस्करांचे एक कोटीवर केले नुकसान-
श्रीगोंदा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पीड बोटच्या सहाय्याने घोडनदीच्या पात्रात उतरून सलग दोन दिवस सांयकाळी कारवाई केली. यात त्यांनी एकूण 25 बोटी उध्वस्त केल्या. यात साधारण 1 कोटी 10 लाख रुपयांचे वाळू तस्करांचे नुकसान झाले. भविष्यात देखील अशाच प्रकारे कारवाई करून अवैध गौण खनिज उत्खनन वाहतूकीला आळा घालणार असल्याचे तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी सांगितले.
हेही वाचा -'खुन्यांना पाठीशी घालणारं सरकार सचिन वाझेंना पुरावे नष्ट करण्याची संधी देतंय का?'
बोटी सापडतात मात्र तस्कर फरार -
श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या घोड, भिमानदीत नगर-पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीत मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी चालते. मुख्यत्वे यांत्रिक बोटीच्या साहाय्याने अवैधपणे वाळू उपसा दिवस-रात्र सुरू असतो. वाळू तस्कर स्थानिकांना जुमानत नाहीत. तक्रार करणाऱ्यांवर दहशत केली जाते. पोलीस-महसूल विभागाच्या कारवाया नियमित होत असल्या तरी अवैध वाळू उपसा हा सुरूच असल्याचे दिसून येते. महत्वाचे म्हणजे बहुतांशी कारवायांमध्ये यांत्रिकी बोटी सापडतात. त्या जागेवर नष्टही केल्या जातात. मात्र, वाळू तस्कर सापडत नाहीत. कारवाईवेळी ते दरवेळी पळून जाण्यात यशस्वी होतात. असेच अनेकदा दिसून येते. याबद्दल स्थानिकात नाराजी आहे. वाळू तस्करांना राजकीय आशीर्वाद असल्याची चर्चा ही सर्वश्रुत आहे. त्यामुळे वाळू तस्करांना जेरबंद करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा -अहमदनगर : कोरोनामुळे शनीअमावस्या यात्रा रद्द; शनिशिंगणापूर देवस्थानचा निर्णय