अहमदनगर- कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आणि घरीच थांबण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. मात्र, अनेक बेजबाबदार नागरिक अनावश्यकपणे रस्त्यांवर फिरत प्रतिबंधात्मक आदेशाची पायमल्ली करत आहे. त्यामुळे, अशा १३२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून शहरातील ३५ पेक्षा जास्त दुकानांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे.
जमावबंदी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात १२ पथके कार्यरत करण्यात आली आहेत. स्वतः जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपाधीक्षक संदीप मिटके यांनी शहरात विविध रस्त्यांवर फिरत कारवाई केली असून नागरिकांचे प्रबोधन केले आहे. यावेळी पोलिसांकडून काही नागरिकांना तात्पुरते ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. विनाकारण दुचाकी-चारचाकी किंवा पायी फिरणाऱ्यांनाही पोलिसांनी परत पाठवले. असे असले तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, रुग्ण किंवा योग्य कारणासाठी बाहेर पडणाऱ्यांना विचारपूस करून पोलिसांकडून सोडले जात आहे.