अहमदनगर :शिर्डीजवळील निमगाव येथे असलेल्या साई पालखी निवारामधील हॉटेलच्या लिफ्टची वायर तुटल्याने मोठा अपघात झाला. ही लिफ्ट अचानक चौथ्या मजल्यावरून खाली आदळत, पुन्हा चौथ्या मजल्यावर जाऊन धडकली. यात मुंबईच्या विरार येथील चार साई भक्त महिला आणि एक लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांना उपचारांसाठी साई संस्थानच्या साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
असा झाला अपघात..
मकरसंक्रांतीनिमित्त मुंबईतील विरार येथून साईबाबांच्या दर्शनासाठी म्हात्रे परिवार शिर्डीला आले होते. त्यांनी शिर्डीजवळील निमगाव येथील साई पालखी निवारातील हॉटेलमध्ये रुम घेतली होती. सायंकाळी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आल्यानंतर स्वाती म्हात्रे, वैशाली म्हात्रे, हेमलता म्हात्रे, दिपाजली म्हात्रे आणि यांचा बरोबर तीन लहान मुले रात्री नऊच्या सुमारास बाहेर पडली होती. चौथ्या मजल्यावरुन लिफ्टने खाली येत असताना अचानक लिफ्टची वायर तुटल्याने लिफ्ट थेट खाली येऊन आदळली, आणि पुन्हा चौथ्या मजल्यावर जाऊन अडकली.