शिर्डी : शिर्डी विमानतळाच्या भोवताली अद्यावत शहराची उभारणी होणार आहे. त्यामुळे येथील परिसराची भरभराट होणार आहे. दुष्काळी असलेला काकडी अर्थात शिर्डी विमानतळाचा परिसर आधुनिक सुविधायुक्त करणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील बैठकीत केले आहे.
विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसवण्यासाठी शिर्डी विमानतळ परिसराची निवड करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. बुधवारी (29 सप्टेंबर) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मानस व्यक्त केला आहे. वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही ७६ वी बैठक होती. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच "आशा" असे या विकसित भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करणार आहे.