अहमदनगर - जिल्ह्यातील खामगाव शिवार येथे रविवारी शेतात काम करणाऱ्या एका मुलीच्या अंगावर वीज पडल्याने तिचा मृत्यू झाला. शुभांगी राजू शिंदे (वय १४) असे या मुलीचे नाव असून ती नववीत शिकत होती.
शेवगावात वीज पडून नववीतील मुलीचा मृत्यू - lightning
रविवारी शेतात काम करायला गेलेल्या शुभांगीच्या अंगावर अचानक वीज पडली आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शेवगाव तालुक्यामध्ये रविवारी पडत असलेल्या पावसामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना खामगाव शिवारामध्ये एक दुर्घटना घडली. शुभांगी सकाळी आपल्या शेतामध्ये खुरपणीसाठी गेली असता अंगावर वीज पडून मृत्युमुखी पडली. पाऊस पडत असल्यामुळे शुभांगी आणि तिच्या बरोबरीच्या मुली घरी जायला निघाल्या. शुभांगी बरोबर असणाऱ्या इतर दोघी पुढे गेल्यावर शुभांगी एकटीच पाठीमागे राहिली होती. यातच पावसामध्ये अचानक तिच्या अंगावर वीज पडली आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दुपारी पावणे दोन ते तीनच्या दरम्यान घडली असे कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले.