अहमदनगर - अकोले तालुक्यातील झोळेकर वस्तीजवळ रात्री संतोष कारभारी गांवडे (वय ४५) हे शेतमजूर शेतातील काम उरकून घरी जात असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला. अकोले तालुक्यातील धुमाळवाडी, धामणगाव या गावांत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे शेळ्या, मेढ्यांवर हल्ले सुरुच आहेत. अशा घटना घडत असल्यामुळे ग्रामस्थांनी अनेकदा पिंजरा लावण्याची वनविभागाकडे विनंती केली आहे. मात्र, या विनंतीकडे वनविभागाने कायम दुर्लक्ष केले आहे.
अकोले तालुक्यातील शेतमजूराचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्याविषयी बोलताना गणेश पापळ उपसरपंच धामणगाव आवारी 'नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी'
या घटनेची स्थानिकांनी पोलीस पाटील प्रणाली प्रशांत यांना माहिती दिली. त्यानंतर या घटनेची कल्पना वनाधिकारी भाग्यश्री पोले, वनपाल पारधी, पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, सरपंच डॅा. रविद्र गोर्डे, यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, घटनास्थाळाचा पंचनामा करुन गावंडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दिला. धुमाळवाडी, धामणगाव आवारी गावात बिबट्याचा वावर वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.
'गावंडे यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य'
आता बिबट्याच्या तोंडाला माणसाचे रक्त लागले आहे. त्यामुळे हा बिबट्या आता नरभक्षक झाला आहे. या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठा धोका निर्माण झाला आहे. याची दखल वनविभागाने तत्काळ घेऊन परिसरात दोन ते तिन ठिकाणी पिंजरे लावावेत. अशी, मागणी धुमाळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. रवींद्र गोर्डे यांनी केली आहे. धुमाळवाडी येथील घटनेत प्रथमदर्शनी बिबट्याचे हल्ल्यात सदर शेतमजूराचा मृत्यू झाला आहे. गावंडे यांच्या मृत्यूनंतर आता वनविभागाकडून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य त्या दिले जाणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल भाग्यश्री पोले यांनी दिली आहे.