शिर्डी -अहमदनगर जिल्ह्यातीलशिर्डी येथील काँग्रेस कमिटीचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले व साईबाबा वेल्फेअर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा रुग्णालयातील कोविड निषिद्ध क्षेत्रात विनापरवानगी तसेच पीपीई किट परिधान न करता, कोणतीही दक्षता न घेता त्यांनी रुग्णालयात प्रवेश केला. तसेच, कोविड रुग्णांना भेटून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी दिली.
साईबाबा संस्थानच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूममधील कर्मचारी किशोर साहेबराव गवळी (वय 44) यांनी याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की 'श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल येथील कोविड रूग्णांना भेटण्यासाठी जाण्याची परवानगी नाही. मात्र, 9 व 10 मे या काळात सचिन चौगुले व अरुण जाधव (रा. शिर्डी) यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, पीपीई कीट परिधान न करता; शिवाय, इतर कोणतीही दक्षता न घेता रूग्णलयात प्रवेश केला. उपचार घेत असलेल्या रुग्णांना भेटून जिल्हाधिकार्यांच्या कोरोना रोखण्याच्या आदेशाचे उल्लंघन केले'.
या फिर्यादीवरून काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले व संस्थानच्या विद्युत विभागाचे कर्मचारी अरुण जाधव यांच्या विरोधात भादंवि कलम 188, 269, 271 साथरोग अधिनियम 1897चे कलम 2, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005चे कलम 51प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रूपवते करत आहेत.