अहमदनगर- जिल्ह्यात शहरासह अनेक तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची सरकारी आकडेवारी आणि स्मशानभूमीत दहन होत असलेल्या मृतदेहांच्या आकडेवारी मोठी तपावत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची नेमकी संख्या किती? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शासकीय आकडेवारीपेक्षा अधिक मृत रुग्णांवर नगरच्या अमरधाममधील विद्युत दाहिणीत आणि सरण रचून अंत्यविधी केला जात असल्याचे गेल्या दोन दिवसात दिसून आले आहे. शासकीय आकडेवारीनुसार शुक्रवारी तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार विद्युत दाहिणीत 20 तर सरणावर 29 अशा एकूण 49 मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्याची माहिती आहे. तर गुरुवारी ही आकडेवारी ४२ असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रशासन सज्ज असल्याचा दावा -
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रसारित केलेल्या माहितीनुसार रुग्णालयात पुरेसे खाट असल्याचे सांगितले आहे. त्यात अतिदक्षता (आयसीयू), ऑक्सिजन खाट, पुरेसा ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचे आणि रुग्णसंख्या पंधरा हजार ग्राह्य धरून उपाययोजना केली असल्याचे स्पष्ट केले आहे.
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या बातम्या..