१३ हजार १९४ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद, सरासरी ८२.७३ टक्के मतदान - अहमदनगर ग्रामपंचायत निवडणूक मतदान
राज्यात शुक्रवारी एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. अहमदनगर जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतीसाठी ११ लाख ६७ हजार २५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येत्या सोमवारी (१८ जानेवारी) सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.
अहमदनगर -जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींसाठी ८२.७३ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक ८७ टक्के मतदान श्रीगोंदा तालुक्यात झाले. येत्या सोमवारी (१८ जानेवारी) सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतीसाठी ११ लाख ६७ हजार २५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७१ टक्के मतदान झाले होते. मतदानाच्या अखेरच्या टप्यात मतदानाचा वेग वाढला. काही केंद्रांवर मतदारांनी केंद्राबाहेर उशिरापर्यंत रांगा लावल्याचे चित्र होते. ग्रामपंचायतीसाठी मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साह दिसून येत होता. गावापासून दूर वाड्या-वस्त्यांवर असलेल्या मतदारांसाठी काही उमेदवारांनी वाहनांची व्यवस्था केली होती. त्यामुळे मतदार सकाळीच मतदानासाठी बाहेर पडलेली दिसली.
तालुकानिहाय मतदान - (कंसात ग्रामपंचायतींची संख्या)
- नगर (६५) ८१.२४ टक्के
- पारनेर (७९) ८४.७७ टक्के
- श्रीगोंदा (५८) ८७.३२ टक्के
- कर्जत (५४) ८५.०० टक्के
- जामखेड (३९) ७७.५० टक्के
- पाथर्डी (७५) ८२.०७ टक्के
- शेवगाव (४८) ८३.४० टक्के
- नेवासा (५२) ८१.५६ टक्के
- श्रीरामपूर (२६) ८०.७७ टक्के
- राहुरी (४४) ८१.३२ टक्के
- राहाता (१९) ८०.२० टक्के
- कोपरगाव (२९) ८२.१८ टक्के
- संगमनेर (९०) ८४.१३ टक्के
- अकोले (३६) ८१.४० टक्के
- एकूण (७०५) ८२.७३ टक्के
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी (महसूल) ऊर्मिला पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणुकीचे नियोजन केले होते. १३ हजार १९४ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रांत बंद झाले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने, सर्वांच्या नजरा आता निकालाकडे लागल्या आहेत. येत्या सोमवारी (१८ जानेवारी) सकाळी नऊ वाजेपासून प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. नगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी आणि हिवरेबाजार सह काही ग्रामपंचायतींच्या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.