अहमदनगर - पाथर्डी शहराजवळील केळवंडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. सक्षम गणेश आठरे असे या मुलाचे नाव आहे. सक्षम घरात झोपलेला असताना बिबट्याने हल्लाकरून त्याला उचलून नेले होते. नातेवाईक व वनविभागाने मिळून शोध घेतला असता सकाळी सहा वाजता सक्षमचा मृतदेह तुरीच्या शेतात आढळला आहे. गर्दी पाहताच बिबट्या पळून गेला.
बिबट्याच्या हल्यात आठवर्षीय मुलाचा मृत्यू, पाथर्डी तालुक्यात आठवडाभरातील दुसरी घटना - पाथर्डी बिबट्या हल्ला मृत्यू न्यूज
मानवी वस्तीमध्ये जंगली प्राण्यांचा वावर वाढत असल्याचे चित्र आहे. विशेषत: बिबटे सर्रासपणे मानवी वस्तीत फिरत आहेत. पाथर्डी तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली असून बिबट्याने आतापर्यंत दोन बालकांचा जीव घेतला आहे.
गेल्या आठवड्यातही बिबट्याने एका मुलीची हत्या केली होती. या प्रकारामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. गेल्या आठवड्यात पाथर्डी तालुक्यातील काकडदरा भागात एका साडेतीन वर्षीय बालिकेला बिबट्याने उचलून नेले होते. त्यात तिचा मृत्यू झाला. वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी वाढली लागली आहे.
वन विभागाने बिबट्याचे संभाव्य वास्तव्य असलेल्या भागात पिंजरे लावले आहेत. मात्र, अद्याप हा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला नाही. थेट लोकवस्तीत बिबट्याचे हल्ले होऊ लागल्याने नागरिक आणि वनविभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे.