अहमदनगर (शिर्डी):महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून शिर्डी दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल रात्री शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर नाशिककडे जाताना अमित ठाकरे यांची गाडी सिन्नर येथील टोल नाक्यावर अडवल्याचा प्रकार घडलाय. त्यानंतर संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाकाच फोडलाय. घडलेल्या घटने बाबत अमित ठाकरे यांनी शिर्डीत खुलासा केला आहे.
काय म्हणाले अमित ठाकरे?अमित ठाकरे यांचा काल आणि आज शिर्डी महासंपर्क अभियानाचा दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान अमित ठाकरे यांनी काल रात्री शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर वैयक्तिक कामानिमित्त ते समृद्धी महामार्गाने नाशिकला निघाले होते. याबाबत अमित ठाकरेंनी सांगितले की, सिन्नर टोलनाक्यावर फास्टटॅगमधून टोल कट न झाल्याने दहा ते पंधरा मिनिटे टोल कर्मचाऱ्यांनी गाडी थांबवली. आम्ही त्यांना तांत्रिक अडचणीविषयी सांगितले; मात्र कर्मचारी उद्धट भाषा वापरत होते. माझ्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, गाडीत अमित ठाकरे आहेत. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकाला देखील फोन लावला. मात्र व्यवस्थापक देखील उद्धट भाषा वापरत होता. टोलनाका कर्मचाऱ्यांनी पंधरा ते वीस मिनिट गाडी थांबवून ठेवली. ही बाब सिन्नर येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी टोल नाका फोडला.