महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नगरमध्ये कोरोनाचा कहर सुरूच; शुक्रवारी झाले ५७ जणांवर अंत्यसंस्कार

गेल्या काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसाला सरासरी ३० पेक्षा जास्त रूग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे स्मशानभूमीतील चितांची आग चोवीस तास धगधगत आहे.

Ahmednagar corona patients cremation news
अहमदनगर कोरोनाबाधित अंत्यसंस्कार बातमी

By

Published : Apr 17, 2021, 9:21 AM IST

Updated : Apr 17, 2021, 9:37 AM IST

अहमदनगर - जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज तीन हजारांपेक्षा जास्त रूग्ण कोरोनाबाधित आढळत आहेत. रूग्णांना बेडपासून ते ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेमडेसीवीर मिळवण्यासाठी झगडावे लागत आहेत. दररोज सरासरी तीसपेक्षा जास्त रूग्ण दगावत आहेत. शुक्रवारी एकाच दिवशी 57 रूग्ण दगावल्याने अंत्यसंस्कारासाठी मृतांच्या नातेवाईकांना वाट पाहावी लागली.

नगरमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे

५७ मृतांपैकी २० जणांवर अमरधाम येथील विद्युत दाहिणीत तर 37 जणांवर सरण रचून अंत्यविधी करण्यात आले. आरोग्य यंत्रणेच्या माहितीत शुक्रवारी चाळीस मृत्यू झाल्याची आकडेवारी प्रसारित करण्यात आली होती. खाजगी कोविड रुग्णालये वेळेत मृत्यूंची माहिती शासकीय पोर्टलवर भरत नसल्याने ही तफावत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा शल्य चिकित्सकांनी गुरूवारी ईटीव्ही भारतशी बोलताना दिले आहे.

अंत्यविधीसाठी नविन दोन ठिकाणी व्यवस्था -

अंत्यविधीसाठी लागणारा वेळ आणि एकाचवेळी अनेक मृतदेह जळताना पाहून नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. त्यामुळे आता इतर दोन ठिकाणी अंत्यविधी केले जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जागांची पाहणी केली आहे. शहरातील केडगाव उपनगर आणि रेल्वे स्थानक परिसरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यामुळे जागे अभावी थांबले जाणारे अंत्यविधी वेळेत पार पाडता येतील, असे वाकळे यांनी सांगितले.

रेमडेसीवीरची अवैधपणे पंचवीस हजारांना विक्री -

ऑक्सिजन प्रमाणेच रेमडेसीवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. शासकीय, खासगी रूग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांना इंजेक्शन आणण्यास सांगितले जाते. त्यामुळे अनेक खासगी मेडिकल चालकांनी रेमडेसीवीरचा काळाबाजार सुरू केला आहे. याबाबत श्रीरामपूर, अहमदनगर येथे अन्न-औषध विभागाने डमी ग्राहक पाठवून महागात इंजेक्शन विकणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. एका प्रकरणात एक नर्स रेमडेसीवीर इंजेक्शन चढ्या दराने विकताना रंगेहात पकडली आहे. पोलीस, अन्न-औषध विभाग छापेमारी करत असले तरीही अनेक ठिकाणी वीस ते पंचवीस हजार रुपयांना हे इंजेक्शन विकले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. हा काळाबाजार थांबवला जावा, अशी मागणी होत आहे.

१६ एप्रिल, २०२१ची परस्थिती -

२ हजार ५३ रूग्णांना डिस्चार्ज

३ हजार ५६ नविन बाधितांची भर

रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.२२ टक्के

उपचार सुरू असलेली रूग्णसंख्या १७ हजार ६५७

आतापर्यंत एकूण मृत्यू १ हजार ४४१

एकूण रूग्ण संख्या १ लाख २९ हजार २५७

बरी झालेली एकूण रूग्ण संख्या १ लाख १० हजार १५९

हेही वाचा -ऑक्सिजन पुरवठ्यावरून खासगी व जिल्हा शासकीय रूग्णालयात वादंग

Last Updated : Apr 17, 2021, 9:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details