श्रीरामपूर (अहमदनगर) -तालुक्यातील एकलहरे येथील एका शेतातून तब्बल 53 लाख 54 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांच्या विशेष पथकाने छापा टाकत ही कारवाई केली. तसेच यावेळी सलमान शब्बीर तांबोळी (रा. बेलापूर), वैभव चोपडा आणि साहिल चोपडा (दोघे रा. निमगाव, राहाता) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये पोलिसांचा छापा; 53 लाख 54 हजारांचा गुटखा जप्त
अहमदनगरच्या अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांच्या पथकाने कारवाई करत तब्बल 53 लाख 54 हजारांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथील एका शेतातील शेडमध्ये गुटख्याचा मोठा साठा आहे, तसेच या ठिकाणावरून जिल्हाभरात स्थानिक गुटखा व्यापाऱ्यांना तो पार्सल होत आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांना मिळाली होती. यानंतर काळे आणि डी. वाय. एस. पी. राहुल मदने यांनी या परिसरात पाळत ठेवली. ठिकाणाची निश्चित माहिती होताच त्यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. तसेच राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त केला. तब्बल 53 लाख 54 हजार रुपये किंमतीचा गुटखा या कारवाईत जप्त करण्यात आला. तसेच अशोक लेलँडचा छोटा टेम्पो, आयशर टेम्पोसह आरोपींना अटक करण्यात आली.
दरम्यान, राज्यात गुटखा बंदी झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात गुटखा साठ्याची छुप्या मार्गाने वाहतूक करण्यात येत असल्याचे या कारवाईतून पुढे आले आहे. पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे एकीकडे कौतुक होत असतांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती देईपर्यंत स्थानिक पोलीस काय करत होते? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. या कारवाईने स्थानिक पोलिसांच्या कार्य तत्परतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.