अहमदनगर - श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर येथील गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरण आणि हत्याकांड खंडणीतून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. ते श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
हिरण अपहरण आणि हत्याकांड आरोपी -
गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरण आणि हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून पाच आरोपींना अटक केली आहे. संदिप मुरलीधर हांडे (वय 26, माळेगाव, ता.सिन्नर), जुनेद उर्फ जावेद बाबू शेख (वय 25, रा.सप्तशृंगीनगर, नायगाव रोड, सिन्नर), अजय राजू चव्हाण (वय 26, पास्तेगाव, मारुती मंदिरासमोर, सिन्नर), नवनाथ धोंडू निकम (वय 29, रा.उक्कडगाव, ता.कोपरगाव) व एक 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
आरोपींकडून मुद्देमाल जप्त -
आरोपींकडून हिरण यांचा मोबाईल फोन तसेच अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली मारुती व्हॅन (क्र. एमएच 15, जीएल 4387) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सागर गंगावणे व बिट्टू वायकर या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. मात्र, त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. गुन्ह्यातील काही आरोपी हे सराईत आहेत. त्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपासात आणखी काही आरोपी निष्पन्न होतील. हिरण यांच्याकडे अपहरण झाले त्यावेळी 1 लाख 65 हजार रुपयांची रक्कम होती. हिरण यांची हत्या मारुती व्हॅनमध्येच करण्यात आली होती. त्यानंतर मृतदेह एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गालगत आणून टाकण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली.