अहमदनगर - शिर्डी शहरातील पार्किंगमधून 18 फेब्रुवारीला अज्ञात व्यक्तीने पाच महिन्यांची चिमुरडी चोरून नेल्याची घटना घडली होती. या मुलीला २४ तासांच्या आत निमगाव ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी शोधले आहे. निमगावमधील सप्ताह मैदाना जवळील शिंदे मळ्यात काट्यांमध्ये या मुलीला टाकून देण्यात आले होते. या घटनेतील आरोपी फरार असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस त्याचा माग घेत आहेत.
शिर्डी येथील प्रसादालयासमोरील पार्किंगमधून मध्यप्रदेश येथील सीमा रावत या महिलेची पाच महिन्यांची मुलगी एका अज्ञात व्यक्तीने झोळीतून उचलून नेली होती. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिर्डी पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू केला. निमगाव हद्दीतील सप्ताह मैदानाशेजारील शिंदे मळा येथे अंजनाबाई निकम या 65 वर्षीय वृद्ध महिला खुरपणी करत असताना त्यांना काट्यांमध्ये रडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी आवाजाच्या दिशेने शोध घेतला असता एक बेवारस बाळ रडताना आढळून आले.