अहमदनगर -पोलीस प्रशासनाच्या शिफारशी वरून जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी विधानसभा निवडणूक निर्भय, मुक्त, शांतपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल ४२८ जणांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. यापैकी काही जणांचे शस्त्र परवाने हे गुन्हे दाखल असण्याच्या पार्श्वभूमीवर तर शस्त्र परवाने असूनही शस्त्र न घेतल्यामुळे रद्द केले आहेत. १ हजार १४१ जणांना आचारसंहिता संपेपर्यंत शस्त्र जमा करण्याचे फर्मान जारी केले आहे. जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी ही कारवाई केली आहे.
अहमदनगरमधील ४२८ जणांचे शस्त्र परवाने रद्द, १ हजार १४१ जणांना जमा करण्याचे आदेश
अहमदनगरमध्ये विधानसभा निवडणूका निर्भय आणि शांततेत पारपडण्यासाठी जिल्ह्यातील ४२८ जणांचे शस्त्र परवाने जप्त करण्यात आले. १ हजार १४१ जणांना आचारसंहिता संपेपर्यंत शस्त्र जमा करण्याचे फर्मान जारी केले आहे
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडे शस्त्र परवाने रद्द करत संबंधित व्यक्तींकडील शस्त्रे जमा करण्यासंदर्भात आदेश होण्याबाबत प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक यांच्याकडून हा प्रस्ताव दाखल करताना विधानसभा निवडणूक निर्भय, मुक्त, शांततेत पार पाडण्यासाठी ज्या शस्त्र परवानाधारकांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांचे शस्त्रे परवाने रद्द करून, शस्त्रे जमा करून घेण्याबाबत विनंती करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावांवर विचार करून एकूण ४२८ शस्त्रपरवानाधारक व्यक्तींचे शस्त्रपरवाने रद्द केले आहेत. पोलीस निरीक्षकांनी याबाबतच्या कारवाईचा अहवाल सादर करायचा आहे. यासोबतच विधानसभा निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून काही व्यक्तींची शस्त्र जमा करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव प्राप्त दाखल झाले होते. या प्रस्तावावर अंतिम निर्णय देत जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळापर्यंत जिल्ह्यातील १ हजार १४१ परवानाधारक व्यक्तींची शस्त्र जमा करण्याचे फर्मान जारी केले आहे.