अकोले (अहमदनगर) - तालुक्यात कोरोनाचा कहर सतत वाढत आहे. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार तीन नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. तर अकोले तालुक्यातील इंदोरी फाटा परिसरातीाल 74 वर्षीय एखा उद्योजकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. चार-पाच दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे तालुक्यातील हा कोरोनाचा सहावा बळी ठरला आहे.
अकोले तालुक्यात 3 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, एकाचा मृत्यू
अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात मंगळवारी तीन नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. यामुळे एकुण बाधितांची संख्या 219 वर पोहोचली असून आतापर्यंत तालुक्यात सहा जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे. त्यातच अकोले शहरात लोकांचे गर्दीचे प्रमाणही वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचे प्रमाणही समाधानकारक आहे. मात्र गेल्या आठवड्यात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाले. दोन दिवसांपूर्वी राजूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असणाऱ्या कोतुळ येथील तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, मंगळवारी (11 ऑगस्ट) खासगी प्रयोग शाळेतील रात्री उशिरा आलेल्या अहवालात अकोले शहरातील कारखाना रोड येथील एक व लोकमान्य रोड येथील पोस्ट ऑफीस जवळील एक महिला, असे दोन तर मेहेंदुरी येथील एक, अशा तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकुण बाधितांची संख्या 219 झाली आहे. त्यापैकी 158 जण कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी परतले आहेत, तर 55 व्यक्तींवर सध्या उपचार सुरू आहेत.