शिर्डी- करोनाने जगाला बंदीशाळा केल्याने संपूर्ण जग करोनाच्या संकटाचा सामना करत आहे. डॉक्टर्स, शास्त्रज्ञ अहोरात्र मेहनत करून या महाभयंकर आजारावर औषध शोधण्यासाठी धडपड करत आहेत. आता विज्ञानाला अध्यात्माची जोड देत करोना योद्ध्यांना आत्मबळ मिळण्यासाठी साई निर्माण ग्रुपच्यावतीने महिनाभरापासून घर तेथे साईचरित्र या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. उद्या (गुरुवारी) भारतासह जगातील 21 देशांतील लाखो साईभक्त या उपक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती साईनिर्माण उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते यांनी दिली.
शिर्डीतील साईनिर्माण उद्योग समूहाच्या माध्यमातून आजवर देशाच्या विविध भागात दीड हजार गावात सामुदायिक साईचरित्राचे पारायण आयोजित करून साईचरित्र वाचनाची मोठी चळवळ उभी केली आहे. या माध्यमातून लाखो साईभक्तांचा साईनिर्माण परिवारासोबत जोडले गेले आहे. साईबाबांनी आपल्या हयातीत महामारीचे संकट दूर केल्याचा दाखला साईचरित्रात आहे. याच पार्श्वभूमीवर साईनिर्माणचे विजय कोते यांनी माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते आणि साईनिर्माणच्या सदस्यांच्या मदतीने शिर्डीतून घर तेथे साईचरित्र पारायणाची सुरवात केली.