शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रस्त्यावरील लांबच लांब रांगा आणि साई मंदिरात प्रवेशासाठी होणारा त्रास यापासून दिलासा मिळणार आहे. साई संस्थानने 6 एकर जागेवर 112 कोटी रुपये खर्चून हायटेक दर्शन क्यू कॉम्प्लेक्स बांधले आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या इमारतीचे काम आता पूर्ण झाले आहे.
पंतप्रधानांना निमंत्रण :या नवीन दर्शन क्यू कॉम्प्लेक्समध्ये एकाच वेळी 12 ते 18 हजार भाविक बसू शकतात. मोठ मोठे वातानुकूलीत एसी हॉल, बायोमेट्रिक दर्शन पास, व्हीआयपी व्यवस्था, केटरिंग, कॅंटिंग सुविधा, टॉयलेट, बुक स्टॉल, लाडू प्रसाद हे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहे. या दर्शन क्यू कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुजोरा दिला आहे. साईट्रस्ट, राज्य सरकारच्या वतीने पंतप्रधानांना निमंत्रण पाठवण्यात येत आहे.
रांगेतून होणार भाविकांची सुटका :निळवडे धरणाचे लोकार्पण आणि श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थापन समितीच्या दर्शन रांगेच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापुर्वी निमंत्रण दिले आहे. राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रधानमंत्र्यांना विनंती केली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. शिर्डी साईबाबांचे देश-विशात कोट्यवधी भक्त असून, सुट्ट्या, सणांच्या दिवशी विक्रमी गर्दी होत असते. भाविकांना रस्त्यावर दर्शन रांगेत तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. ना बसण्याची पुरेशी व्यवस्था ना चहापाणची. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या त्रासातून आता भाविकांची सुटका होणार आहे.