अहमदनगर - चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या शिर्डीत गेल्या तीन दिवसांत चोवीस कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिर्डीतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढील दहा दिवस लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे़. नागरिकांनी घेतलेल्या या निर्णयाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे व नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी स्वागत केले आहे. नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने चांगले परिणाम दिसतील, असा विश्वास शिंदे व दिघे यांनी व्यक्त केला आहे.
शिर्डीतील वाढत्या पेशंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी व व्यवसायिकांनी दहा दिवसांसाठी लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 17 जुलै पासून पुढील दहा दिवस शहरात संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. या काळात सकाळी 9 ते दुपारी 2 वाजे पर्यंत फक्त अत्यावश्यक असलेल्या मेडीकल, किराणा, भाजीपाला व दूध या अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. अन्य सर्व दुकाने, संस्था बंद ठेवण्यात येणार आहेत.