संगमनेर (अहमदनगर) -कोरोनाच्या दुसर्या लाटेत संगमनेर मधील प्रशासन व गावागावातील स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून प्रत्येक गावात प्रभावी उपाययोजना राबवण्यात आल्या. घरोघर तपासणी, तातडीचे विलगीकरण यांसह तालुक्यात नागरिकांच्या झालेल्या सर्वाधिक कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामुळे १०८ गावे कोरोना मुक्त झाली आहेत. तर ४१ गावे कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहेत.
संगमनेर पॅटर्न कोरोना लढ्याचे आदर्शवत मॉडेल -
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे संगमनेर तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या थांबवण्यासाठी ते सातत्याने प्रशासनाला सूचना देत होते. यानुसार संगमनेर तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक कोरोना टेस्ट झाल्या. याच बरोबर घरोघर नागरिकांची तपासणी करण्यात आली. गावागावात ग्राम आरोग्य रक्षक दलातील युवकांनी कार्यक्षमपणे काम करून काही लक्षणे आढळल्यास तातडीने विलगीकरण केले. विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर उभे करून नागरिकांना अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या. या संगमनेर पॅटर्नमुळे कोरोना लढ्याचे आदर्शवत मॉडेल तयार झाले. देवकौठे ते बोटा असा मोठा विस्तीर्ण असलेल्या संगमनेर तालुक्यात १७१ गावे व २६३ वाड्या-वस्त्या आहेत. पुणे, नाशिक या शहरांशी जवळीक व जादा दळणवळण यांसह संगमनेरमध्ये असलेली चांगली वैद्यकीय सुविधा यामुळे संगमनेर शहरात कोपरगाव, राहाता, जुन्नर, पारनेर, अकोले, सिन्नर या तालुक्यांमधून अनेक नागरिक कोरोना उपचारांसाठी संगमनेरात येत होते.