नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रवी दहियाने रौप्य जिंकले आहे. मात्र, सुवर्णपद पदक जिंकण्याचे त्याचे स्वप्न अखेर हुकले. रवी कुमार दहियाचा फायनलमधील पराभव पाहून तिहार जेलमध्ये असलेल्या कुस्तीपटू सुशील कुमारला रडू कोसळलं. सुशील कुमार कुस्तीपटू साखर धनखडच्या हत्येप्रकरणी तो सध्या तुरुंगात आहे.
सुशील कुमार सध्या तिहार जेलच्या बराक क्रमांक 2 आहे. तिहार जेलमधल्या खुल्या भागामध्ये सुशील कुमारसह अन्य कैद्यांना ऑलिम्पिक बघण्यासाठी टीव्ही दिला आहे. सुशीलने तरुंगातून रवी दहियाचा सामना पाहिला. यात रवीचा पराभव होताना पाहून सुशील रडल्याचे तरुंगातील सूत्रांनी सांगितले.
छत्रसाल स्टेडियममध्ये रवी दहियाने सुशील कुमारकडूनच कुस्तीचे डावपेच शिकले होते. रवी दहिया आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे जाईल, असा दावाही सुशीलने केला होता. पण रवी दहियाला अंतिम सामन्यात रशियन पैलवानाने हरवले. यामुळे रवीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पण तिहार तुरुंगात बसून सामना पाहणारा सुशील त्याच्या पराभवामुळे खूप दुःखी झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला आशा होती, की रवी या सामन्यात सुवर्णपदक जिंकेल, पण ते होऊ शकले नाही. सुशील कुमारने भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सलग दोन वेळा पदक जिंकलं. सुशीलने 2008 बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कास्य तर 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं.