टोकियो (जपान) -भारतीय पुरुष भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने जबरदस्त प्रदर्शन करत पहिल्याच प्रयत्नात ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने 86.65 मीटरचे अंतर पूर्ण केले.
या खेळात प्रत्येक खेळाडूला तीन संधी दिल्या जातात. यात सर्वोत्तम प्रयत्नाच्या बळावर खेळाडूला गुण दिले जातात. अर्थात अजून हा पहिलाच राऊंड आहे. यात 16 खेळाडू खेळत आहेत. अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी पुरुष खेळाडूला 83 मीटरचे अंतर पूर्ण करणे गरजेचे होते. नीरज ने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटरचे अंतर पूर्ण केले. तर यासोबतच आणखी एक ग्रुप आहे यात 15 खेळाडू 83 मीटरचे अंतर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. ग्रुप बीमध्ये भारतीय खेळाडू शिवपाल सिंह याचा समावेश आहे. हे दोन्ही पात्रता फेरी झाल्यानंतर या सर्वांच्या प्रदर्शनाच्या आधारावर त्यांना गुण दिले जातील. आणि टॉप 12 खेळाडू पुढच्या फेरीसाठी पात्र ठरतील.
दरम्यान, याआधी भारतीय भालाफेक महिला खेळाडू अन्नू रानीने आज ऑलिम्पिक स्टेडियममध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व केले होते. ज्यात तिने सर्वश्रेष्ठ 54.04 मीटर अंतर पार केले आणि आपल्या ग्रुपमध्ये 14व्या स्थानावर राहिली. यामुळे ती अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही.
अन्नू ने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 50.35मीटर अंतर पूर्ण केले होते. तर दुसऱ्या प्रयत्नात तिने आधीच्या तुलनेत अधिक चांगले प्रदर्शन करत 53.14मीटर अंतर पूर्ण केले. यानंतर आपल्या अंतिम प्रयत्नात तिने 54.04मीटर चे अंतर पूर्ण करत ती आपल्या ग्रुपमध्ये 14व्या क्रमांकावर राहिली. यासोबतच तिचा ऑलिम्पिकचा प्रवास संपला. भालाफेकच्या पात्रता फेरीत दोन ग्रुप तयार केले गेले होते. यात प्रत्येक ग्रुपमध्ये 15-15 खेळाडू होते. अन्नू रानीला ए ग्रुपमध्ये स्थान देण्यात आले होते. या दोन्ही ग्रुपच्या प्रत्येक खेळाडूला तीन संधी देण्यात आल्या होत्या. यात त्यांना अंतिम फेरीसाठी पात्र व्हायला 63मीटर अंतर पूर्ण करणे गरजेचे होते.
नीरज चोप्रा हरियाणाच्या पानीपत जिल्ह्याच्या खंडरा गावचे रहिवासी आहेत. ऑलिम्पिक सामन्यापूर्वी ईटीव्ही भारतने नीरजच्या नातेवाईकांशी संवाद साधला होता. त्यांना त्याच्या कामगिरीबाबत विश्वास होता. नीरज चोप्राचे काका भीम चोप्रा यांनी सांगितले होते की, नीरज आपल्या खेळाबाबत आधीपासून फार गंभीर राहिला आहे. तो आपल्या खेळात आणखी सुधार करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहे. तर यासोबतच त्याची धाकटी बहीण नैनसीनेही त्याच्या कामगिरीबाबत विश्वास व्यक्त केला होता.