महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 27, 2021, 9:34 AM IST

ETV Bharat / sports

Tokyo Olympics : भारतीय पुरूष हॉकी संघाचा स्पेनवर दणदणीत विजय

भारतीय पुरूष हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवातून सावरत ऑलिम्पिकमध्ये जोरदार पुनरागमन केले. आज मंगळवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने स्पेनवर 3-0 असा दणदणीत विजय मिळवला.

Tokyo Olympics Hockey: India beats Spain 3-0, Rupinder Pal Singh scores brace
Tokyo Olympics : भारतीय पुरूष हॉकी संघाचा स्पेनवर दणदणीत विजय, स्पर्धेतील आव्हान कायम

टोकियो -भारतीय पुरूष हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवातून सावरत ऑलिम्पिकमध्ये जोरदार पुनरागमन केले. आज मंगळवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने स्पेनवर 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान कायम राहिले. भारताकडून रुपिंदरपाल सिंगने 2 आणि सिमरनजीत सिंगने 1 गोल केला.

स्पेनविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. पहिल्या क्वार्टरमधील 14व्या मिनिटाला सिमरनजीत सिंगने गोल करून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुढील एका मिनिटात रुपिंदरपाल सिंगने गोल करून भारताची आघाडी 2-0 अशी वाढवली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आलं नाही. त्यामुळे मध्यांतराला भारताकडे 2-0 अशी आघाडी कायम राहिली.

तिसऱ्या क्वार्टर देखील गोलरहित राहिला. पण या क्वार्टरमध्ये स्पेनला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. त्यावर त्यांना गोल करता आला नाही. चौथ्या क्वार्टरमधील 51 व्या मिनिटाला भारताला पेनाल्टी कॉर्नर मिळाला. यावर रूपिंदरपाल सिंगने गोल करून भारताला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली.

दरम्यान, भारतीय संघाला स्पेनविरुद्धच्या सामन्यात 4 पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यावर 1 गोल करण्यात भारताला यश आले. दुसरीकडे स्पेनला तब्बल 7 पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र त्यांना एकही गोल करता आला नाही. भारतीय गोलरक्षक श्रीजेशने त्यांना गोल करू दिला नाही. या विजयासह भारतीय संघ गटात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

भारतीय संघाने न्यूझीलंडवर 3-2 ने मात करत ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केली होती. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताला 1-7 अशा मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर भारतीय संघाने स्पेनला 3-0 ने पराभूत करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. आता भारताचा पुढील सामना बलाढ्य अर्जेंटिनाविरुद्ध होणार आहे.

हेही वाचा -Tokyo Olympics : महिला हॉकीत नेदरलंडकडून भारताचा 5-1 ने पराभव

हेही वाचा -Tokyo Olympics : भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव

ABOUT THE AUTHOR

...view details